Thu, Apr 25, 2019 13:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गरिबीला कंटाळून मुलांनी घेतला मावशीचा आधार

गरिबीला कंटाळून मुलांनी घेतला मावशीचा आधार

Published On: Feb 12 2018 2:18AM | Last Updated: Feb 12 2018 1:32AMभिवंडी : वार्ताहर

घरच्या गरिबीला कंटाळून एका 15 वर्षीय बहिणीने 10 वर्षीय भावासह घरातून पलायन करून उत्तर प्रदेशमधील मावशीचा आधार घेतल्याची धक्कादायक बाब भिवंडी शहरातील मस्ताननगर येथे उघडकीस आली आहे. मस्ताननगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत साफिया बानो अन्सारी (32) ही महिला चार मुली आणि मुलासह राहते. तिला चार मुलीच झाल्याने पती मोहमंद जावेद हा तीन वर्षापूर्वी पत्नी व मुलांना उघड्यावर टाकून सोडून गेला. यामुळे पत्नी सोनाळे गावातील एका खासगी कंपनीत मुलांच्या पालनपोषणासाठी मजुरीचे काम करत आहे. अहोरात्र काम करूनही पगारात घरखर्च भागात नसल्याने घरात दिवसेंदिवस हलाखीची परिस्थिती निर्माण झाली.

त्यातच तिची 15 वर्षाची मोठी मुलगी सुफिया आणि तिचा 10 वर्षाचा लहान भाऊ अबुसार हे दोघे 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमाराला घरातून अचानक बेपत्ता झाले. तीन दिवस सर्वत्र शोध घेवूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर या मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दुर्दैवी मातेने शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. एकीकडे पोलीस तपास सुरू असतानाच दुसरीकडे आई साफिया हिला 9 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील तिच्या मूळ गावाकडील तिरकमाथा, सुलतानपूर येथील मोठी बहीण फातिमाबानो हिचा फोन आला. तुझी दोन मुले माझ्याकडे आली आहेत, असे तिने साफियाला सांगितले. 

याबाबत साफियाने तात्काळ शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोउनि देविदास घोगरे यांच्याशी संपर्क साधून हरवलेली मुले उत्तरप्रदेशमध्ये बहिणीकडे असल्याची माहिती दिली. दरम्यान, तुझी दोन्हीही मुले सुखरूप आहेत. तूच त्यांना घेवून ये, असे पोलिसांनी या मातेला सांगितले. मात्र या मातेकडे मुलांची भेट घेण्यासाठी लागणारे गाडी भाड्यापुरतेही पैसे नव्हते. यामुळे कंपनीचा पगार झाल्यावरच तिने उत्तरप्रदेशमधील बहिणीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.