Fri, Apr 19, 2019 12:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरमध्ये टिअर गॅस गन झाल्या कालबाह्य 

उल्हासनगरमध्ये टिअर गॅस गन झाल्या कालबाह्य 

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:11AMअंबरनाथ : राजेश जगताप

आधिच प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍यांची अपुरी संख्या आणि त्यात शस्त्रपुरवठाही कालबाह्य झाल्याने पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दंगल, आंदोलने अथवा तत्सम लोकांच्या गर्दीला पांगवण्यासाठी अथवा त्यांना आवर घालण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये विशेष शस्त्रपुरवठा केलेला असतो. त्यात महत्त्वाचे एक शस्त्र म्हणजे टिअर गॅस गन. मात्र उल्हासनगर पोलीस परिमंडळ चारमधील पोलीस ठाण्यांत यातील बहुतेक गन कालबाह्य झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या संकटसमयी पोलिसांनी काय करायचे? असा प्रश्‍न आहे. 

विशेष म्हणजे या कालबाह्य झालेल्या गन बदलून मिळाव्यात यासाठी मागणीही केली असून, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ औपचारिकतेपोटी पोलीस ही टिअर गॅस गन घेऊन अनेक ठिकाणी आंदोलन किंवा दंगलींना सामोरे जातात. उल्हासनगर पोलीस परिमंडळ चार अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर अशा तीन शहरांचा समावेश आहे. या तीन शहरांमध्ये उल्हासनगरात 4, अंबरनाथमध्ये 2 आणि बदलापुरात 2 अशा 8 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी प्रत्येकी दोन ते तीन टिअर गॅस गन देण्यात आले आहेत. याचाच अर्थ परिमंडळ चारमधील पोलीस ठाण्यात 16 किंवा 24 टिअर गॅस गन (गॅस ग्रीनेड) उपलब्ध आहेत. मात्र यातील बहुतांश गॅस गन कालबाह्य झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे एखादे संकट उद्भवल्यास पोलिसांना या गॅस गनचा वापर करता येऊ शकणार नाही.