Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिळक, एल्फिन्स्टन पूलही धोकादायक

टिळक, एल्फिन्स्टन पूलही धोकादायक

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 1:08AMमुंबई : राजेश सावंत 

पश्‍चिम व मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणार्‍या दादरचा लोकमान्य टिळक पूल हा 1924 मध्ये, तर परळचा (कॅरल ब्रिज) एल्फिन्स्टन पूल 1913 मध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात बांधण्यात आला आहे. दोन्ही पुलांचे वय आता 94 व 105 वर्षे झाले आहे. या पुलांवरून ये-जा करणार्‍या गाड्यांच्या संख्येतही गेल्या दोन ते तीन दशकांत तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण या पुलांच्या मजबुतीकरणाकडे रेल्वे व मुंबई महापालिकेकडून फारसे लक्ष दिलेले नाही. या पुलांचा आजही शहरातील अन्य पुलांच्या तुलनेत जास्त वापर होत आहे. त्यामुळे हे पूल कोसळून अंधेरीसारखी दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नसल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दादर, वरळी, प्रभादेवी, शिवाजीपार्क, माहीम आदी भागांसह दक्षिण मुंबई व पश्‍चिम उपनगरांतील बहुतांश गाड्या दादरच्या टिळक व परळच्या एलफिन्स्टन पुलाचा वापर करतात. शिवडी, वडाळा, परळ, लालबाग, काळाचौकी आदी भागासह दक्षिण मुंबई व सायन, चेंबूर, वाशी आदी भागात जाण्यासाठी हे पूल वाहन चालकांना अधिक सोयीचे असल्यामुळे या दोन्ही पूलांवर नेहमीच वाहनांची गर्दी असते. टिळक पूलावरून दररोज सुमारे 60 ते 65 हजारापेक्षा जास्त गाड्या ये-जा करतात. तर एलफिन्स्टन पूलावरून दररोज सुमारे 40 ते 45 हजारापेक्षा जास्त गाड्या ये-जा करतात.

दोन ते तीन दशकापुर्वी या पूलावरून ये-जा करणार्‍या गाड्यांची संख्या दररोज 15 ते 20 हजाराच्या घरात होती. एलफिन्स्टन पुलाचा वापर परळ एसटी आगारातून सुटणार्‍या सर्व बस करतात. त्याशिवाय सुमारे 200 हून जास्त खाजगी बस, खाजगी वाहने व बेस्टच्या बसही या पुलाचा वापर करतात. त्यात पूलांखालून जाणार्‍या लोकल, मेल, एक्सप्रेसचा बसणारा हादरा, यामुळे हे पूल धोकादायक बनले आहेत. एलफिन्स्टन पुलावर एकावेळी दोन बस आल्या तर, येथे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात एखादी गाडी बंद पडली तर, परळ गौरीशंकर ते परळ एसटी आगार हे अवघे एक किमीचे अंतर कापायला तास ते दिड तास लागतो. 

टिळक पुलाची रूंदीही जेमतेम 40 ते 45 फूट आहे. त्यात या पूलावर पाच ते सहा फुटाचे पदपथ असल्यामुळे गाड्यांना जेमतेम 35 फुट रूंद जागा शिल्लक राहते. त्यामुळे या पूलावर दिवसभर वाहनांची गर्दी दिसून येते. या पूलाच्या खाली मध्य व पश्‍चिम रेल्वेचे दादर स्टेशन आहेत.  त्याशिवाय येथे सर्वच मेल-एक्सप्रेस गाड्या थांबत असल्यामुळे टिळक पुलाचा प्रवाशांसह पादचारीही मोठ्याप्रमाणात वापर करतात. एवढेच नाही तर या पूलाखालून पश्‍चिमेला सेनापती बापट मार्ग (तुळसीपाईप रोड) व  पूर्वेला रूईया महाविद्यालयपर्यंत जाणारा दादासाहेब फाळके रोड आहे. या रस्त्यांवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते.

पुलाच्या डागडुजीसाठी पालिका सकारात्मक नाही

टिळक व एलफिन्स्टन पुलाच्या रूंदीकरणाबाबत आपण अनेकदा पालिकेच्या पूल विभागाच्या बैठका घेतल्या. पण या पूलाच्या रूंदीकरणासह त्याच्या डागडुजीसाठी कोणते प्रयत्न केले, याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळालेले नाही. पूल विभागाचे मुख्य अभियंता शीतला प्रसाद कोरी यांना बैठकीना बोलावूनही ते कधी आले नाही. त्यामुळे महापालिका पुलाच्या डागडुजीसाठी सकारात्मक नसल्याचे दिसून येते.  -विशाखा राऊत, सभागृह नेत्या, मुंबई महापालिका 

मुंबईकरांचा जीव जाण्याची वाट बघता का?

दादरचा टिळक व परळचा एलफिन्स्टन हे दोन्ही पूल जुने आहेत. अनेकदा या पूलावरून जाताना हादरे जाणवतात. त्यामुळे अंधेरीसारखी दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही. या पूलांची गेल्या अनेक वर्षात दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबई महापालिका व रेल्वे प्रशासन हे दोन्ही पूल कोसळून मुंबईकरांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का ? - भाई गवस, रहिवासी, परळ

पुलाची रूंदी  वाढवण्याची मागणी

टिळक व एलफिन्स्टन पूल जुने झाले असून सध्याची रहदारी ते सहन करू शकत नाही. त्यामुळे हे पूल कोसळून त्या ठिकाणी किमान चार पदरी पूल उभारण्यात यावे, अशी मागणी गेल्या दहा वर्षापासून स्थानिकांनी लावून धरली आहे. याबाबतची मागणीही पालिकेच्या जी-दक्षिण व जी-उत्तर विभाग कार्यालयात लेखी पत्र देऊन करण्यात आली आहे. - तुषार राऊळ, रहिवासी,  दादर