Wed, Apr 24, 2019 20:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील व्यावसायिकाला पुजारीकडून खंडणीसाठी धमकी

अंधेरीतील व्यावसायिकाला पुजारीकडून खंडणीसाठी धमकी

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:10AMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरीतील एका वयोवृद्ध व्यावसायिकाला रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमकी आली आहे. सहा महिन्यांत रवी पुजारीने 90 वेळा कॉल करुन दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे तक्रारदार व्यावसायिकाने डी.एन. नगर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. या तक्रारीनंतर रवी पुजारीविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरु असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले. 

तक्रारदार व्यावसायिक अंधेरी येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून त्यांची एक खाजगी कंपनी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची जगन्नाथ पुरोहित याच्याशी ओळख झाली होती. पुरोहितने त्यांच्या बोगस स्वाक्षरी आणि कागदपत्रांच्या आधारे सहा कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पुरोहितविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच डिसेंबर 2017 रोजी पहिल्यांदा त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन आपण रवी पुजारी बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर डिसेंबर 2017 ते मे 2018 या कालावधीत त्यांना रवी पुजारीने वेगवेगळ्या मोबाईलवरुन दोन कोटींसाठी धमकी देत पुरोहित यांना सहा कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. तसे केले नाही तर परिणाम वाईट होतील अशी धमकीही दिली होती. 

याबाबत त्यांनी डी. एन. नगर पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे वकिल शाहबाज पठाण यांच्यामार्फत पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. अखेर सहा महिन्यानंतर डी. एन. नगर पोलिसांनी रवी पुजारीविरुद्ध खंडणीची मागणी करुन तक्रारदार व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. 

काही दिवसांपूर्वी रवी पुजारीने अंधेरीतील एका फार्मास्टिकल व्यावसायिकाला कॉल करुन त्यांच्याकडून 25 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी अलीकडेच ओशिवरा पोलिसांनी रवी पुजारीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा संमातर तपास खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी करीत आहेत. या घटनेला काही दिवस उलटत नाही,  तोच आता रवी पुजारीने अन्य एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याने व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.