Fri, Dec 14, 2018 00:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिसर्‍या मजल्यावरून फेकून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न

तिसर्‍या मजल्यावरून फेकून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 12:59AMपालघर : वार्ताहर

पालघर पूर्वेत शेलवली येथे राहणार्‍या हेमंत भोसले (34) याला  पालघरमधील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली फेकल्याची घटना गेल्या महिन्यात 5 जानेवारी रोजी घडली. या घटनेची तक्रार हेमंत भोसले यांनी रविवार (4 फे ब्रुवारी) रोजी रुग्णालयातून घरी परतल्यावर दिली. याप्रकरणी अ‍ॅड. सुरेंद्र तिवारी, भोला तिवारी आणि असिफ खान यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेमंत भोसले 5 जानेवारी रोजी पालघरला गेला असता त्याला शिरगाव येथे राहणारा मित्र असिफ खान भेटला. त्याने हेमंतला  माझ्या एका मित्राला फ्लॅट हवा आहे तर आपण दाखवायला जाऊ, असे सांगितले. हेमंत असिफसोबत जाण्यास तयार झाला. थोड्या वेळात अ‍ॅड.सुरेंद्र तिवारी आणि भोला तिवारी हे दोघे तेथे आले. त्याने हेमंतला कुठे काम करतो, माझ्याकडे काम करण्यास चल आम्ही तुला रोज 4 ते 5 हजार देऊ, असे सांगितले. हेमंतने कामास नकार दिल्याने दोघांनी त्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हेमंत जायला निघाला तेव्हा तुला जिवंत रहायचे आहे की मरायचे आहे? असा सवाल करून भोलाने हेमंतचे मागून हात पकडले व सुरेंद्र याने पायाला पकडून खेचत नेऊन इमारतीच्या मधल्या गॅपमध्ये फेकून दिले. त्यानंतर तिघेही तेथून फरार झाले. 

याबाबत काही व्यक्तींनी संजय दुबे यांना कळवल्यानंतर हेमंतला धडा रुग्णालयात दाखल केले. हेमंतच्या हातापायाला तसेच डोक्याला जबर दुखापत झाली आहे. दुसर्‍या दिवशी हेमंतची पत्नी पालघर पोलीसांत तक्रार दाखल करण्यास गेली असता पोलिसांनी तिची तक्रार तर दाखल करुन घेतली नाहीच शिवाय तिलाच उलटसुलट प्रश्न विचारून गोंधळून टाकले. हेमंत उपचार घेऊन 4 फेब्रुवारी रोजी घरी परतला तेव्हा त्याने पालघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अ‍ॅड. सुरेंद्र तिवारी, भोला तिवारी आणि असिफ खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.