Mon, Jun 24, 2019 16:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सायन रुग्णालयाबाहेर जमावाची तुफान दगडफेक, ९ जबर जखमी

सायन रुग्णालयाबाहेर जमावाची तुफान दगडफेक, ९ जबर जखमी

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 12:50AMधारावी : वार्ताहर 

धारावीतील  सचिन रवींद्र जैस्वार (17) याचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने सायन रुग्णालयाबाहेर तुफान दगडफेक केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यात 4 पोलीस शिपायांसह 9 सुरक्षारक्षक जबर जखमी झाले आहेत. माटुंगा वाहतूक पोलीस चौकी, 3 पोलीस वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिनचा धारावी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

सायन पोलिसांनी जमावातील काही लोकांना ताब्यात घेतले. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांना चौकशी करून सोडण्यात आले. धारावी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप असलेल्या जखमी सचिनचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेकडोचा जमाव सायन रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकला. रुग्णालयात तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी जमावाला रोखले. दरम्यान सुरक्षारक्षक आणि जमावात शाब्दिक चकमक उडाली.

इतक्यात सायन पोलिसांची वाहने आली असता जमावाने पोलीस वाहनाला लक्ष्य करीत दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यात वाहनाच्या काचा फुटून पोलीस जखमी झाले. सुरक्षारक्षकांना मारहाण करीत जमाव रुग्णालयात शिरला. त्यानंतर संतप्त जमावाने आपला मोर्चा माटुंगा वाहतूक पोलीस चौकीकडे वळवला आणि पोलीस चौकीवर जोरदार दगडफेक केली. त्यात वाहतूक पोलीस चौकीच्या खिडक्यांच्या काचा फुटून पोलीस जखमी झाले. रुग्णालय परिसरात भयावह स्थिती निर्माण झाली. 

पोलिसांची कुमक वाढल्याने जमावाने काढता पाय घेतला. सचिन जैस्वार याच्या मृत्यूचा वाद चांगलाच चिघळला असून सचिन जैस्वार याच्या पालकांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिल्याने धारावी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. हे प्रकरण आता कोणते वळण घेते याकडे लक्ष लागले आहे.