ठाणे जिल्ह्यातील तीन हजार लोक स्थलांतरित

Last Updated: Jun 04 2020 1:13AM
Responsive image


ठाणे : पुढारी वृत्तसेवा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकले नाही आणि ते पुण्याच्या दिशेने सरकले. तरीही या वादळाचे परिणाम ठाणे जिल्ह्यालाही भोगावे लागले. वादळी पावसामुळे जिल्ह्यात 33 घरे कोसळली,  195 झाडे उन्मळून पडली आणि असंख्य वाहनांचे नुकसान झाले.  घर कोसळून मुंब्र्यातील  दोन जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही जिल्ह्यातील तीन हजार 90 लोकांना खाडी किनार्‍यावरून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. 

ठाणे शहरातील 60 ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे काही वाहनांचे नुकसानही झाले. चेंदणी कोळीवाड्यात एक घर कोसळले. ठाणे जिल्ह्यातील 192 झाडे आणि 33 घरे कोसळली. एक विजेचा खांब कोसळला असून कल्याण येथील तीन बकर्‍या मृत पावल्या आहेत.

या वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. वादळाचा फटका बसू नये म्हणून भाईंदर येथील उत्तन किनारपट्टीवरील पाळी, डोंगरी येथील 700,  कांबा, वरप, म्हरल येथील 400, शहापूर तालुक्यातील 1067, नवी मुंबई 462, आणि नवी मुंबईतील 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. नवी मुंबई, मीरा-भाईंदर व उत्तन, भिवंडी, कल्याण, डोंबिवली महानगर पालिका तसेच शहापूर तालुक्यातील उंच ठिकाणावरील घरे रिकामी करण्यात आली. कल्याण ग्रामीण भागातील म्हारळ, वरप, जू गाव आणि कांबा या चार गावांतील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हलविण्यात आले.

उत्तनला राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक तसेच राज्य आपत्ती निवारण पथक तैनात करण्यात आले होते. रायगडमध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान झाल्याने ठाण्यातील राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण पथकाच्या सहा तुकड्या रायगड जिल्ह्याला पाठवण्यात आल्या आहेत. बुधवारी दुपारनंतर या वादळाने पुण्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवल्यामुळे ठाणे जिल्ह्यावरील निसर्ग वादळाचे संकट टळले असले तरी पुढील 24 तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.