होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंबोली पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित

आंबोली पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:23AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

नाशिक येथे शस्त्रसाठ्यासह सापडलेली बोलेरो गाडी चोरी झाल्याची तक्रार नोंदवून घेण्यात हलगर्जीपणा करणार्‍या आंबोली पोलीस ठाण्यातील तीन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. 

अंधेरी पश्‍चिमेकडील 90 फुटी रोडवरील लष्करिया इमारतीसमोरून 5 डिसेंबरच्या रात्री बोलेरो गाडी चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी फिरोज खान हे आंबोली पोलीस ठाण्यात पोहोचले. ही तक्रार नोंदवून न घेता जवळपासच्या परिसरात गाडीचा शोध घेऊन दोन दिवसांनी परत या असा सल्ला आंबोली पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी खान यांना दिला. याच गाडीचा वापर करत शिवडीतील आरोपी बदयुजमान अकबर बादशाह उर्फ सुमित उर्फ सुका (27) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेशातील गोदामामधून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा यशस्वीपणे चोरी केला. हा शस्त्रसाठा मुंबईत आणताना नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावर पोलिसांनी याच बोलेरो गाडीसह शस्त्रसाठा जप्त केला. स्थानिक पोलीस उपायुक्तांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्यासह उपनिरीक्षक प्रमोद काटे आणि गणेश देवकाते यांचा हलगर्जीपणा उघड झाला.