Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुकानदार 1 रुपाया जास्त घेत असल्याच्या वादातून हत्या

दुकानदार 1 रुपाया जास्त घेत असल्याच्या वादातून हत्या

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:55AMकल्याण : वार्ताहर

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळ-3 मधील महात्मा फुले, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस ठाणे अशा तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शुक्रवारी तीन हत्यांच्या घटनांनी एकच खळबळ माजली. या हत्यांमध्ये एका वृद्धाची केवळ एक रुपया जास्त घेतल्याच्या किरकोळ कारणावरून हत्या झाली. तर उर्वरित दोन्ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनांमुळे कल्याणमध्ये मोठी खळबळ माजली आहे.  

कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात राहणारे मनोहर गामने या वृद्धाने येथीलच प्रभू जनरल स्टोअर्स दुकानातून दोन अंडी घेतली. दुकानदाराने  दोन अंड्यांचे अकरा रुपये झाल्याचे सांगितल्याने मनोहर यांनी दहा रुपयाला दोन अंडी सर्वत्र मिळतात, मग एक रुपया तुम्ही जास्त का घेता? असा प्रश्‍न दुकानदाराला विचारला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला.रागाच्या भरात दुकानदार व त्याच्या दुकानात काम करणार्‍या दोघांनी मिळून  मनोहर यांना मारहाण केली. या मारहाणीत मनोहर हे जमिनीवर पडून वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी म. फुले पोलीस ठाण्यात दुकानदार व त्याच्या सहकार्‍याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात क्रिकेट मॅचच्या जुन्या वादातून अशोक मालुसरे या तरुणाला याच परिसरात राहणार्‍या तस्लीम शेख व लल्लन या दोघांनी बेदम मारहाण केली. यात अशोकला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांविरोधात कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांचा  शोध सुरू केला आहे. मृत अशोक मालुसरे हा हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याने पदाधिकार्‍यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात एकच गर्दी केली होती.