Sun, Mar 24, 2019 06:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत तीन मुलींचा डबक्यात मृत्यू!

भिवंडीत तीन मुलींचा डबक्यात मृत्यू!

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 1:32AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्ती असलेल्या दहेलेपाडा येथे खदानीच्या डबक्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नीता चैत्या फकाट (14), रोहिता रवी मांगात (13), रसिका रवी मांगात (12) अशी या तिघींची नावे आहेत.

यातील नीता ही रोहिता आणि रसिकांची मावशी होती. दरम्यान, सोमवारी रात्री या तिघींचे मृतदेह येथील ग्रामस्थांनी बाहेर काढले. तसेच पोलिसांना याची कोणतीही माहिती न देताच परस्पर अंत्यसंस्कार उरकले. 

दहेलेपाडा येथील आदिवासी वाडीत चैत्या फकाट हे कुटुंबीयांसह राहात असून त्यांची विधवा मुलगी शारदा आपल्या दोन मुलींसह त्यांच्याच घरात राहात होती. घरातील पुरुष मंडळी व शारदा हे सर्व मोलमजुरीसाठी भिवंडी शहरात गेले असता नीता, तिची बहीण शारदाच्या मुली रोहिता आणि रसिका या दुपारी उष्णतेमुळे चैत्या फकाट यांच्या शेतात खदानमधील डबक्यात साचलेल्या पाण्यात पोहोण्यासाठी गेल्या होत्या. नीता खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने रोहिता व रसिका या बहिणींनी आपल्या मावशीला वाचवण्याचा प्रयत्न करायला गेल्या असता त्यासुद्धा पाण्यात बुडू लागल्या.

याचवेळी तेथे असलेल्या रोहन व रोशन या भावांनी घरी जाऊन आई सुकरीबाई हिला मुली बुडत असल्याची माहिती दिली. त्यांनीही तात्काळ डबक्याजवळ येऊन मुलींना वाचविण्यासाठी आजूबाजूला आरडाओरड केली. मात्र, दुपारची वेळ असल्याने, शिवाय बहुसंख्य पुरुष मंडळी घराबाहेर असल्याने या तिघींना वाचविण्यात अपयश आले. उशिराने आलेल्या पुरुष मंडळींनी या तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. रात्री 9 वाजता या घटनेची कोणतीही माहिती स्थानिक निजामपुरा पोलीस ठाण्याला न देताच या तिघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस यंत्रणेला मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) दिलीप गावित यांनी घटनास्थळी भेट देत दुर्घटनेची माहिती घेतली.

Tags : Mumbai, Bhiwandi, Three girls, die,  dump, Mumbai news,