Fri, May 24, 2019 08:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यशस्वी ‘लाँग मार्च’मागचे तीन चेहरे

यशस्वी ‘लाँग मार्च’मागचे तीन चेहरे

Published On: Mar 13 2018 2:19AM | Last Updated: Mar 13 2018 2:19AMआमदार जिवा पांडू गावित 

गावित हे नाशिकच्या कळवण विधानसभा मतदारसंघातून सात वेळा निवडून आले आहेत. ते मार्क्सवादी पक्षाचे सदस्य आहेत. त्यांच्या रूपाने डाव्या पक्षांचा एकमेव सदस्य महाराष्ट्र विधिमंडळात कार्यरत आहे. गावित हे आदिवासी असून, साधी राहणी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. या लाँग मार्चचे ब्रेन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या लाँग मार्चमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्याचे कारण गावित हेच आहेत. पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या आणि वन खात्याने ताब्यात घेतलेल्या जमिनींचा ताबा पुन्हा आदिवासी बांधवांना देण्याचे आश्‍वासन देणार्‍या वनहक्‍क कायदा 2006 च्या अंमलबजावणीसाठी ते लढा देत आहेत.

अशोक ढवळे : अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा

अशोक ढवळे यांच्याकडे नुकतेच अखिल भारतीय किसान सभेचे नेतृत्व आले आहे. ते गोदावरी परुळेकर यांचे कट्टर अनुयायी आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 1993 सालापासून ढवळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतीच्या विविध प्रश्‍नांवर त्यांनी लढा दिला आहे. वनहक्‍क कायद्याची अंमलबजावणी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी यांसाठी ते आग्रही आहेत. दहा वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील विशेष आर्थिक क्षेत्रासाठी होणार्‍या भूसंपादनालाही त्यांनी कडाडून विरोध केला होता. बुलेट ट्रेन आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाविरोधातही त्यांनी लढा पुकारला आहे. 

अजित नवले : राज्य सचिव, अखिल भारतीय किसान सभा

जून 2017 मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात नवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याच आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी आणि किमान आधारभूत किंमत आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचीही मागणी केली. शेतकर्‍यांनी संपावर जाण्याचा, तसेच शहरांना होणारा फळ आणि भाजीपुरवठा बंद करण्याचाही इशारा दिला. वाटाघाटीनंतर कर्जमाफीचा आराखडा ठरविण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या सुकाणू समितीवर नवले यांची सदस्य म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. त्या आराखड्यावर नवले समाधानी नव्हते. याविरोधात जिल्हा आणि तालुकापातळीवर होणार्‍या आंदोलनांना ते मार्गदर्शन करीत आहेत. 

महाराष्ट्राच्या भूमीला लागले रक्ताळलेल्या पायांचे डाग!

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राच्या भूमीला आज शेतकरी बांधवांचे रक्ताळलेल्या पायांचे डाग लागले, अशी टीका करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधान परिषदेत संताप व्यक्त केला. 

विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी किसान सभेच्या लाँग मार्चकडे लक्ष वेधत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर लढणार्‍या ज्या सुकाणू समितीला जीवाणू समिती म्हणून मुख्यमंत्र्यांनी हिणवले आज त्यांचीच ताकद आणि निर्धार बघून सरकारला धडकी भरलीय, असा टोला त्यांनी लगावला. शेकापचे जयंत पाटील यांनी आदिवासींच्या नावावर शेतजमिनी नसल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ  मिळत नसल्याकडे लक्ष वेधत ते कसत असलेले वनपट्टे त्यांच्या नावावर करा, अशी मागणी केली.

आदिवासीच्या डोक्यावर लाल टोपी, हातात लाल निशाण आणि त्यांच्या पायांतून येणारे रक्त लाल आहे. पुतळा पाडला तरी विचार संपत नाहीत, हे आदिवासींनी दाखवून दिलंय, असे सांगून आदिवासींचा वनाधिकार शाबूत ठेवा, अशी मागणी लोकभारतीचे कपिल पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी आदिवासींना आधार असणारी अंत्योदय, अन्नसुरक्षा  योजना बंद करून कष्टकर्‍यांवर अन्याय करू नका, नारपारचे पाणी गुजरातला देऊन आदिवासींच्या हक्काच पाणी हिरावून घेऊ नका, असे सांगत या ठिकाणचा कष्टकरी समाज वेळ पडल्यास, सत्ता उलथवून लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला.  

जयंत जाधव आणि हेमंत टकले यांनी मोठ्या संख्येने मुंबईत पायी चालत आलेल्या मोर्चेकर्‍यांना सुखरूप नाशिकला पोहचता यावे यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, अशी मागणी केली. शिवसेनेचे गटनेते अ‍ॅड.अनिल परब यांनी मोर्चा कुणाचा आहे यापेक्षा त्यामध्ये सहभागी झालेल्यांच्या मागण्या खूप महत्त्वाच्या असल्याचे सांगत किसान सभेच्या मोर्चाचे समर्थन केले.