Fri, May 24, 2019 08:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये 2 दिवसांत तिघांचा बुडून मृत्यू

पालघरमध्ये 2 दिवसांत तिघांचा बुडून मृत्यू

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 12:41AMविरार / मनोर : वार्ताहर 

पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. यात बोईसरच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासह विरारच्या दोन तरुणांचा समावेश आहे. विरार पूर्वेत गांधी चौक येथील एकता कंपाऊंड येथे राहणारा प्रसाद शेमनकर (18) हा तरूण मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करत होता. सोमवारी संततधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने  त्याला कामावर पोहोचणे अशक्य होते. त्यामुळे  मिळालेल्या सुट्टीचा व पावसाचा आनंद घेण्यासाठी तो आपल्या दोन मित्रांसह पापडखिंड धरणावर गेला. संध्याकाळी चारच्या सुमारास प्रसाद व त्याचे मित्र पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा लोट वेगाने आल्याने प्रसादचा बुडनू मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी ही माहिती तेथील सुरक्षारक्षकांना दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. मात्र, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला सोमवारी पाण्याबाहेर काढणे शक्य झाले नाही. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह  पाण्याबाहेर काढण्यास जवानांना यश आले. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

दुसरीकडे विरार पश्चिमेत डोंगरपाडा येथील देशमुख आळीत राहणारा  राकेश खोत (30)  हा तरुण मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास पालिकेच्या तलावात पोहण्यासाठी उतरला असता त्याचाही बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलालाच्या जवानांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केला. या घटनेचीही विरार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

बोईसरमध्ये आठवीच्या वर्गातील मुलगा बुडाला

बोईसर येथील राकेश राजेश यादव (14, रा. न्यू राऊतवाडी) हा विद्यार्थी मंगळवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत म्हाडा सोसायटीमधील विहिरीत पोहण्यासाठी गेला असता, त्याचाही बुडून मृत्यू झाला. राकेश बोईसरच्या आदर्श विद्यालय  शाळेचा 8 वीत शिकत होता. अतिवृष्टीमुळे शाळेला सुट्टी देण्यात आली. तो संध्याकाळी शिकवणीसाठी गेला. तेथून सुटल्यानंतर मित्रांसोबत विहिरीवर पोहायला गेला. राकेश पोहत असताना विहरीत खोलवर असलेल्या लाकडी फळ्या तसेच लोखंडी सळईत अडकल्याने पाण्यात बुडाला. तो बुडाल्याची माहिती मित्रांनी त्याच्या घरच्यांना दिली. यानंतर बोईसर पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन राकेशला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र,  रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह सापडला नाही.  बुधवारी सकाळी तारापूर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे जवान आणि टॅप्स मधील जवान यांनी शोधकार्य सुरू केले. यावेळी साळवड ग्रामपंचायत सदस्य कृष्णा जाधव आणि ग्रामसेवक बागूल यांनी पाणी उपसण्यासाठी 9 पंप लाऊन सहकार्य केले. पाणी उपसल्यानंतर संध्याकाळी 5 च्या सुमारास राकेशचा मृतदेह विहिरीतन काढण्यात आला. मृतदेह तारापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेचा अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत.