होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावच्या आगीत तिघांचा मृत्यू

गोरेगावच्या आगीत तिघांचा मृत्यू

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 1:07AMजोगेश्वरी : विशाल नाईक

गोरेगाव पश्चिमेतील  टेक्निक प्लस या इमारतीच्या सातव्या मजल्यावर एका खासगी बँकेला रविवारी लागलेल्या आगीत नयन मुद्दीन शहा (25) या कामगारासह तिघांचा मृत्यू झाला. अडकलेल्या चार जणांना अग्‍निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. रविवार असल्याने काही कार्यालये बंद होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. काचेची इमारत असल्याने आग विझवताना अनेक अडचणींचा सामना अग्‍निशमन दलाच्या जवानांना करावा लागला. 

नयन याचा मृतदेह सातव्या मजल्यावर आढळून आला. दोघांचे मृतदेह रात्री उशिरा लिफ्टमध्ये आढळले. त्यांची ओळख पटलेली नव्हती. तर आणखी एका व्यक्‍तीला उपचारासाठी  सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाचा शोध सुरु आहे. 

एसव्ही रोडवर एमटीएनएल ऑफिस जवळ ही नऊ मजली इमारत आहे. दुपारच्या सुमारास इमारतीत आग लागली. काही क्षणातच आग  आठव्या मजल्यापर्यंत पसरली. मोठ्या प्रमाणात इमारत परिसरामध्ये धूर पसरला होता. अग्निशमन दलाच्या आठ फायर इंजीनसह सहा पाण्याचे बंब,  रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चार जण सातव्या मजल्यावर अडकले होते. त्यांना मोठ्या शर्थीने अग्‍निशमन दल, गोरेगाव पोलिसांनी  बाहेर काढले.  इमारतीत मोठ्या प्रमाणावर धूर साचला होता. इमारतीच्या काचा जवानांनी फोडल्यानंतर धूर बाहेर आला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तपास करत आहेत. यापूर्वी देखील अंधेरीतील एमआयडीसीत काचेच्या इमारतीत लागलेल्या आगीत धुराने श्‍वास कोंडल्यामुळे काही नागरिकांचा मृत्यू झल्याची घटना घडली होती.