Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 1:01AMभिवंडी : वार्ताहर 

भिवंडी-वाडा रोडवरील शेलार ग्रामपंचायतच्या हद्दीतील बोरपाडा येथे ट्रेलर आणि बुलेट मोटार सायकलच्या भीषण अपघातात दुचाकीवरील 3 युवक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. असद नाजीर हुसेन मिर्झा (23, रा. बंगालपुरा), शोहिद अख्तर अन्सारी (20, रा. गुलजारनगर) व समीर फारुक अन्सारी (20 रा. औरंगाबाद) अशी ठार झालेल्या तिघा युवकाची नावे आहेत. अपघातातील मृत असद मिर्झा याचे 25 जानेवारी व शोहिद अन्सारी याचे 30 जानेवारी रोजी लग्न होते. या दुर्दैवी घटनेने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

असद व शोहिद हे दोघे औरंगाबाद येथून आलेला मित्र समीरला घेऊन वाडा रोडवरील हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले होते. तेथून भिवंडीकडे येत असताना बोरपाडा येथे एका वळणावर समोरुन भरधाव आलेल्या कंटेनरने बुलेटला जोरदार धडक दिली. यात असद आणि शोहिद या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर समीरला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. 

अपघातानंतर अज्ञात ट्रेलर चालक फरार झाला आहे. अपघाताची माहिती रिक्षाचालक मोहिद अहमद मोमीन यांनी भिवंडी तालुका पोलिसांना देवून अज्ञात ट्रेलर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी कवाड टोलनाका येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रेलर चालकाचा शोध सुरू केला आहे.