Thu, Aug 22, 2019 04:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तीन कोटी रुपयांच्या फसवणुकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

तीन कोटी रुपयांच्या फसवणुकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:16AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

सुमारे तीन कोटी रुपयांच्या अपहार  आणि फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध शुक्रवारी आंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विक्री करून फसवणुक केल्याचा या चौघांवर आरोप आहे.  या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. उदय तुकरा सालियन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 2013 साली उदय यांची संबंधित चारही आरोपींशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्यांना त्यांचे अंधेरीतील विरा देसाई रोड, आझाद नगर क्रमांक दोनमध्ये एका इमारतीचे प्रोजेक्ट सुरू असल्याचे समजले होते. 

या इमारतीमध्ये त्यांना एक फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून या चौघांनी त्यांच्याकडून तीन कोटी रुपये घेतले होते. ही रक्कम त्यांनी त्यांचे राहते तसेच बहिणीचे घर विकून दिले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना इमारत क्रमांक 38 मध्ये सहाव्या मजल्यावर फ्लॅट 601 अलोट झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र 2014 सालीच या चौघांनी या फ्लॅटची दुसर्‍या व्यक्तीला विक्री केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना हा प्रकार समजला होता. त्यानंतर त्यांनी आंबोली पोलिसांत या चौघांविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आंबोली पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध 406, 420, 120 ब भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.