Wed, Nov 14, 2018 03:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात १६ लाखांच्या एमडी पावडरसह त्रिकूट अटकेत

ठाण्यात १६ लाखांच्या एमडी पावडरसह त्रिकूट अटकेत

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:37AM

बुकमार्क करा
ठाणे : वार्ताहर 

एफेड्रिन (एमडी पावडर) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नाशिकमधील रेकॉर्डवरील सोनसाखळी चोरासह इंदोरच्या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 822 ग्रॅम एमडी पावडर जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत 16 लाख 44 हजार रुपये आहे. अक्रम खान (30) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात नाशिकात विविध प्रकारचे 18 गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. 

कायदेशीर प्रक्रियेनंतर या आरोपींना नाशिक पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे. अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक येथील अनेक गुन्ह्यांप्रकरणी फरार असलेला, चोरी व सोनसाखळी चोरीतील आरोपी अक्रम खान एमडी पावडर खरेदीसाठी ठाण्यातील नितीन चौक येथे येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा वागळे इस्टेट युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयदीप रणवरे यांना मिळाली होती.

त्यानुसार, सापळा रचून अक्रमला ताब्यात घेतले. तसेच, त्याच्याकडून 16 लाख 44 हजारांचा 822 ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली. त्याने हा एमडीचा साठा मध्य प्रदेश, इंदोर येथील रईसउद्दीन सल्लाउद्दीन शेख (45) आणि अजय जाधव यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार, दोघांनाही अटक करून चौकशी केली असता त्याने हा साठा मध्य प्रदेशच्या बैतूल येथील भोला नामक व्यक्तीकडून घेतल्याची बाब समोर आली. अक्रम हा साठा नाशिकमध्ये नेणार होता. या तिघांनाही न्यायालयात हजर केल्यावर अक्रम खान याला 8 जानेवारी, तर रईस आणि अजय या दोघांना 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.