Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्येप्रकरणी तीन आरोपी २४ तासात गजाआड

हत्येप्रकरणी तीन आरोपी २४ तासात गजाआड

Published On: Apr 06 2018 2:13AM | Last Updated: Apr 06 2018 1:09AMकल्याण : वार्ताहर

कल्याण पूर्वेकडील स्टेशनजवळील बोगद्यात विनोद सुर्वे या व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. निसार मुहंमद शेख (20), अन्सार मुहंमद शेख (19), विकास गणेश अंगारी (19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते खडवली येथील सहारा चाळीत राहणारे आहेत. चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्थानकालगतच्या बोगद्यात चिंचपाडा परिसरात ओम गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या विनोद सुर्वे यांची तिघांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली होती. या दरम्यान सुर्वे यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने रशीद शेख ऊर्फ रॉबिन (29) ही व्यक्ती त्या बोगद्याच्या दिशेने धावली. त्याने तिघांनी विनोदला मारहाण केल्याचे तसेच त्याच्याजवळील सामान हिसकावून पळ काढल्याचे पाहिले होते. त्याने याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

सदरचा तपास एसीपी डी. बी. कांबळे यांच्याकडे सोपवत पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी, महात्मा फुले पोलीस ठाणे व विशेष तपास पथकाने याचा तपास सुरू केला. आरोपींचे वर्णन, सीसीटीव्ही फुटेज, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून तपासणी करण्यात आली. विशेष तपास पथकातील म.फुले चौक पोलीस ठाण्याचे सपोनि के.एन.वाघ, पो. ना. भालेराव, पो. ना. दळवी यांना खबर्‍यामार्फत या गुन्ह्यातील आरोपी खडवली भागात राहणारे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो. नि. (गुन्हे) भोगे व तपास पथकाच्या कर्मचार्‍यांनी खडवली येथून तिघांना अटक केली. 

तिनही आरोपी भाड्याच्या खोलीत राहत होते. विनोदची हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, कोळसेवाडी परिसरात या बोगद्याच्या ठिकाणी अशा लूटमारीच्या घटना नियमितपणे घडत असतात. यामुळे  या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवत चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

tags : mumbai, mumbai news, Three accused arrested, murder case, 24 hours,