Tue, May 21, 2019 12:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचे तीन बळी

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचे तीन बळी

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी

मोठ्या प्रतिक्षेनंतर मान्सूनपूर्व पाऊस मुंबईत दाखल झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला मात्र पावसाच्या पाण्यातून वीजेचा शॉक लागल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भांडूप येथे घडली. शिवाय पहिल्याच पावसामुळेे रेल्वेमार्गातही बिघाड झाल्याने पश्‍चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान ठाण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पालघरच्या काही भागांतही तो बरसला.

मुंबई उपनगरातील भांडूप, मूलूंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, चेंबुर, गोवंडी, बोरीवली, कांदीवली परिसरामध्ये शनिवारी रात्राी मान्सूनपूर्व पावासाच्या सरी बरसल्या. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह प्रवाहीत झाल्याने भांडूप खिंदीपाडा येथ अनिल यादव (वय 32)  आणि झारा युनूस खान (वय 9) या दोघांचा मृत्यू झाला. सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

दुसरी घटना भांडूप पूर्व शिवकृपा नगर येथे घडली. तिथेही पावसाच्या साचलेल्या पाण्यात शॉक लागून ओम अप्पा फडतरे (वय 10 ) याचा मृत्यू झाला, तर याच घतनेमध्ये रोहन सुतार हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोदरेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.शनिवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारनंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली. संध्याकाळी साधारण सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडासह पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वार्‍यासह वीज चमकत पावसाला सुरुवात झाली. लहान मुलांनी पावसात भिजायचा मनसोक्त आनंद लुटला. पहिल्याच पावसात भिजायचा मोह तरुण-तरुणींना देखील आवरता आला नाही. घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द,नालासोपारा,पालघर,वाशी,भिवंडी, बदलापूर, डोंबिवली व कल्याणच्या हद्दीतील ठाणे, ठाणे, मिरा रोड आणि उपनगरातील भागांतही पाऊस झाला. बोरिवली, गोरेगाव, कांदिवली, मुलुंड आणि पवई येथेही पावसाची नोंद झाली.

पश्‍चिम रेल्वे मार्गावर ओव्हर हेड वायरमध्ये शॉर्ट सर्क्रिट होऊन रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात आल्या त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.