Fri, Jul 19, 2019 17:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गरिबीला कंटाळून कफ परेडमधील कुटुंबातील तिघांची आत्महत्या

गरिबीला कंटाळून कफ परेडमधील कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

गरिबीला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात शुक्रवारी उघडकीस आली. दोन दिवस बंद असलेल्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजार्‍यांनी ही माहिती पोलिसांना दिली आणि आत्महत्येचा हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेची नोंद करुन कफ परेड पोलीस तपास करत आहेत.

कफ परेडमधील मच्छीमार नगरमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीमध्ये प्रवीण पटेल (40) हे पत्नी रीना (35) आणि 11 वर्षीय मुलगा प्रभू याच्यासोबत राहात होते. इलेक्ट्रीशियन म्हणून काम करुन प्रवीण हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.

गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेल्या पटेल यांच्या घरातून शुक्रवारी सकाळपासून दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे शेजार्‍यांनी तात्काळ ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या कफ परेड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला असता छताला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेतील पटेल कुटुंबीयांचे मृतदेह त्यांना दिसले.  संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची बातमी सर्वत्र पोहचताच परिसरात एकच खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले.

घटनेची नोंद करुन पोलिसांनी घर तपासले असता एका डायरीमध्ये लिहिलेली सुसाईड नोट त्यांना सापडली. त्यात पटेल यांनी गरीबीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तसेच याच गरीबीमुळे कर्करोगाने आजारी असलेल्या मुलीच्या उपचारांचा खर्च करु शकलो नाही आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.  पटेल यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कर्ज घेतलेल्या व्यक्तींची नावे लिहिली असून आणखी काही जणांची नावे लाहून त्यांच्या वागण्याबाबत टीका केली आहे. त्यामुळे या व्यक्ती पोलिसांच्या रडावर आल्याची माहिती मिळते. प्राथमिक तपासाअंती पटेल यांनी गरीबीला कंटाळल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.