Tue, May 21, 2019 04:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाघोबा खिंडीत दरोडेखोरांचा थरार

वाघोबा खिंडीत दरोडेखोरांचा थरार

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:48AMपालघर ः विशेष प्रतिनिधी

पालघर-मनोर मार्गावर वाघोबा खिंडीत गुरुवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास 7 ते 8 दरोडेखोरांनी घातलेल्या धुमाकुळाने जिल्हा हादरला. वाहनांवर दगडफेक करुन लुटण्याच्या तयारीत असणार्‍या दरोडेखोरांनी वाहनचालकांवर केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत. यावेळी दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झालेल्या तुफान धुमश्चक्रीत एक दरोडेखोर जखमी झाला, तर एकाला पाठलाग करुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. धुमश्चक्रीदरम्यान दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात चार फायर राउंड केले. या थराराने जिल्ह्यात खळबळ माजली असून फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. संतोष भोंगे (45) रा. ऐना, ता. पालघर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पालघर-मनोर मार्गावर वाघोबा खिंडी परिसरात निर्जनस्थळी गुरुवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास 7 ते 8 दरोडेखोर दबा धरुन बसले होते. दरम्यान, मनोर विभागाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांच्या कारवर दरोडा टाकण्याच्या हेतूने दरोडेखोरांनी तुफान दगडफेक केली. मात्र ते दरोडेखोरांच्या हाताला लागले नाहीत. त्यांनी याबाबत  पालघर पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत याच मार्गावरुन जाणार्‍या आणखी दोन दुचाकीस्वारांवर दरोडेखोरांनी दगडफेक करुन त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. यात एक दुचाकीस्वार जखमी झाला. 

हा प्रकार सुरु असताना स्थानिक नागरिक तसेच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, दरोडेखोरांनी थेट त्यांच्याही दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाठलाग सुरु केल्याने त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी बचावासाठी पोलिसांनीही त्यांच्या दिशेने चार फायर राउंड केले. यात एक दरोडेखोर जखमी झाल्याचे समजते. यावेळी पोलिसांनी केलेल्या पाठलागात एका संशयित दरोडेखोराला ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित 7 ते 8 साथीदार फरार झाले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.

पोलीस गस्त वाढविण्याची गरज

वाघोबा खिंडीचा परिसर हा चोरट्यांचा अड्डा बनला असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहेेत. सातत्याने या ठिकाणी अशा घटना घडत असतात. अरुंद वाट तसेच दोन्ही बाजूला डोगरांच्या रांगा तसेच जंगलामुळे चोरट्यांना धुम ठोकण्यास हा परिसर सोईचा आहे. त्यामुळे येथे चोरीच्या घटना वारंवार घडत असून येथे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाघोबा खिंडीला पोलीस छावणीचे स्वरुप

रात्री 10.30 नंतर हा थरार सुरु असताना या ठिकाणी वाघोबा खिंड परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. सफाळे, वाडा, केळवे येथील पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रक पथकाची राखीव तुकडीही येथे मागविण्यात आली. जवळपास 40 ते 50 कर्मचारी या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी धडपडत होते.