Mon, Jun 17, 2019 18:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मितेश जगताप आत्‍महत्‍या : कुटुंबीयांना दुसऱ्यांदा धमकीचे पत्र

मितेश जगताप आत्‍महत्‍या : कुटुंबीयांना दुसऱ्यांदा धमकीचे पत्र

Published On: Feb 15 2018 2:27PM | Last Updated: Feb 15 2018 2:25PMकल्याण  : प्रतिनिधी

मितेश जगताप हत्येप्रकरणी न्यायालयात दाखल केलेली केस मागे घ्यावी यासाठी दुसऱ्यांदा अज्ञात व्यक्तींनी मितेशच्या कुटुंबियांना धमकीचे पत्र पाठवले आहे. या अगोदर दहा दिवसांपूर्वीदेखील निनावी पत्राद्वारे धमकी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

जगताप कुटुंबीयांनी ५ फेब्रुवारीला मिळालेल्या पत्राला भीक न घातल्याने दुसऱ्यांदा निनावी धमकीचे पत्र अज्ञात व्यक्तीने जगताप यांच्या टिटवाळ्यातील राहत्या घरी टाकले. त्यामध्ये म्हटले आहे की, जर केस मागे घेतली नाहीत तर तुम्हाला तुमच्या मुलाकडे पाठवण्यात येईल. न्यायालयातील केस मागे घेण्यासाठी अज्ञात  व्यक्तींकडून या अगोदरच्या पत्राला काहीच प्रतिक्रिया न दिल्याने दुसऱ्यांदा धमकीचे पत्र पाठवण्यात आले असल्याचे मितेशच्या कुटुंबियांनी सांगितले.

या निनावी पत्रात ‘एव्हडे समजवून देखील तुम्हाला कळत नाही, या प्रकरणात तुम्ही चार जणांना उगाचच अडकवतात. तुम्हाला किती किंमत पाहिजे तेव्हडी घ्या पण चौघांना सोडून द्या. जे काही घडले ते नक्कीच चुकीचे घडले ते काही बदलता येणार नाही. तुम्ही जर माघार घेणार असाल उत्तम, नाहीतर २१ तारखे नंतर तुम्हाला तुमच्या मुलाकडे पाठविण्याचे नक्की ठरेल. अस्थीविसर्जनाचा कार्यक्रम कधी ठरवायचा ते ठरवा. सात दिवसांचा वेळ बाकी आहे नीट विचार करा आम्ही तुम्हाला योग्य तो सल्ला देतो’ लिहले आहे.

टिटवाळ्यातील मितेश जगताप या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. मृत मितेशने पोलिसी जाचाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. मृताच्या कुटुंबीयांनाही पोलिसी जाच सुरू झाल्याने ते टिटवाळ्यातील राहते घर सोडून डोंबिवलीला राहायला गेले. तसेच न्याय मिळविण्यासाठी तसेच दोषींवर कारवाईसाठी   न्यायालयात धाव घेतली होती.