Fri, Apr 26, 2019 18:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अटकेची धमकी दिल्याने ज्येष्ठ नागरिक आयसीयूत

अटकेची धमकी दिल्याने ज्येष्ठ नागरिक आयसीयूत

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:08AMडोंबिवली : वार्ताहर

फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार्‍या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या मुलांना धमकावत पोलिसांनीच संबंधित बिल्डरच्या बाजूने स्टेटमेंट घेतल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आहे. कचरू पाटील असे या बिल्डरचे नाव आहे. याप्रकरणी झिपा म्हात्रे या डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकाने वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार केली आहे. एकीकडे गृहखाते ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी सजग असल्याची जाहिरातबाजी करत असतानाच डोंबिवलीत मात्र पोलिसांनी आपणास धमकावल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकाने केल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री-पालकमंत्र्यांसह पोलिसांना यासंदर्भात करण्यात आलेल्या ट्विटची ठाणे पोलिसांनीही दखल घेतली आहे. दरम्यान, अटकेची धमकी दिल्याने धास्ती घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

झिपा म्हात्रे हे 75 वर्षीय नागरिक पश्चिम डोंबिवलीच्या कोपरगावात कुटुंबियांसंवेत राहतात. म्हात्रे यांनी याच गावातील आपली वडिलोपार्जित जमीन एका बिल्डरला 2007 साली विकसित करण्यासाठी दिली. मात्र त्यावेळी करारनाम्याप्रमाणे बांधकाम क्षेत्र देण्यात आले नसल्याची बाब म्हात्रे कुटुंबियांच्या अलिकडेच लक्षात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची लेखी तक्रार म्हात्रे यांनी 5 फेब्रुवारी रोजी विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली. तेव्हा पोलिसांनी दिवाणी बाब असल्याने त्यांना न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. याच दरम्यान म्हात्रे यांनी आपल्या मालकीच्या सदनिका बिल्डरने परस्पर विकू नये म्हणून त्यांना कुलूप लावले व पुढील कायदेशीर कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या. याचवेळी झिपा म्हात्रे यांनी सदनिकांना लावलेल्या कुलुपांबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दिली. 

याची दखल घेत पोलिसांनी झिपा म्हात्रे आणि त्यांच्या मुलांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दुसर्‍या दिवशी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. 9 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात गेलेल्या झिपा म्हात्रे व त्यांच्या मुलांना अटक करण्याची धमकी देऊन पोलिसांनी सदनिकांना लावलेले कुलूप काढण्याचे आदेश दिले. तसेच त्यांच्यावर दबाव टाकून लेखी घेतले. मात्र सदर बिल्डरने म्हात्रे यांनी सदनिकांना लावलेले कुलूप तोडून त्यांना स्वत:चे कुलूप लावल्याचा आरोप झिपा म्हात्रे यांनी आपल्या तक्रारीत केला. पोलिसांच्या धमकावण्यामुळे भयभीत झालेल्या म्हात्रे यांनी अखेरीस याप्रकरणी कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली. 

याच संदर्भात म्हात्रे यांच्या नातीने ट्विटरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीकांत शिंदे यांचासह ठाणे सिटी पोलीस यांचे लक्ष वेधले. त्याला प्रत्युत्तर देत ठाणे शहर पोलिसांनी हे प्रकरण विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवल्याचे सांगितले.याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी, आम्ही या प्रकरणात दोन्ही पक्षांना त्यांचा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याने न्यायालयात जाऊन न्याय मिळवण्याबाबत सूचित केले आहे. दिवाणी प्रकरणात पोलीस हस्तक्षेप करू शकत नाहीत. त्यांचा काय गैरसमज आहे माहीत नाही. दोघांना 149 ची नोटीस दिली आहे. पोलिसांनी कोणाकडून लिहून घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत पोलिसांवरील आरोप फेटाळून लावले.