Thu, Apr 25, 2019 23:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेखाली फेकून ठार मारण्याची धमकी देत लाखोंची लूट

रेल्वेखाली फेकून ठार मारण्याची धमकी देत लाखोंची लूट

Published On: Aug 06 2018 1:41AM | Last Updated: Aug 06 2018 1:00AMमुंबई : अवधूत खराडे 

दादरमध्ये राहात असलेल्या एका वयोवृद्धाला रेल्वेखाली फेकून देण्याची धमकी देत एका व्यक्तीने त्याच्याजवळून तब्बल 12 लाख रुपये उकळले. त्यानंतर आणखी 20 लाखांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अविनाश निकम (50) असे या आरोपीचे नाव असून भोईवाडा पोलिसांनी त्याला खंडणीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने वयोवृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐकदा ऐरणीवर आला आहे.

दादरच्या सेनापती बापट मार्ग परिसरात सुधीर जोशी (65) हे वयोवृद्ध राहातात. ते सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या पत्नी एमटीएनएलमध्ये नोकरी करतात. जोशी यांची मुलगी डॉक्टर असून ती पतीसोबत पुण्याला राहाते. त्यामुळे वृद्ध जोशी दाम्पत्य एकटेच दादरमधील फ्लॅटमध्ये राहात आहे. 2014 मध्ये जोशी हे एका मठामध्ये गेले असताना काळाचौकी परिसरात राहात असलेल्या निकमसोबत त्यांची ओळख झाली. मराठी माणूस तोही मठात भेटल्याने जोशी यांनी विश्‍वास ठेवत त्याला आपल्या कौंटुबिक आयुष्याबाबत सांगितले.

जोशी हे करोडपती असून ते पत्नीसोबत एकटेच राहात असल्याचे ऐकून निकमची नियत फिरली. त्याने जोशींना लुटण्याचा प्लॅन आखला. सुरुवातीला त्याने आपल्या ओळखीच्या लोकांना 9 लाख रुपये व्याजावर देण्यासाठी जोशी यांना गळ घातली. त्याच्यावर विश्‍वास ठेऊन जोशी यांनी सांगितलेल्या व्यक्तींना पैसे दिलेसुद्धा. निकमची भूक वाढू लागली. त्याने आणखी एकाला तब्बल 40 लाख रुपये व्याजावर देण्यास सांगितले. जोशी यांनी ही रक्कमसुद्धा दिली. मात्र तो व्यक्ती पैसे परत करत नसल्याने जोशी यांनी निकमकडे पैशांची मागणी केली. अखेर हे प्रकरण शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोहोचले.

सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हातातून जाईल आणि आपण गजाआड जाऊ या भीतीने निकमने कशीबशी मध्यस्थी करून आणि काही रक्कमही जोशी यांना परत केली. हे प्रकरण मिटले. त्यानंतर निकमने जोशींच्या घरामध्ये घुसून काही महत्त्वाची कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली. याच कादपत्रांच्या बदल्यात धमकावून त्याने त्यांच्याकडून 3 लाख रुपये उकळले. त्याने कागदपत्रे परत केलीच नाही, तर रेल्वेखाली फेकून ठार मारण्याची धमकी देत आणखी 20 लाखांची मागणी सुरू केली. 

निकमकडून होणारा त्रास जीवाच्या भीतीपोटी जोशी कोणाला सांगत नव्हते. त्यामुळेच निकम त्यांना धमकावून पैसे लुटत होता. 65 वर्षे वय असले तरी त्यांना निट चालता येत नसल्याचा फायदा निकम उठवून त्यांना रोज त्रास द्यायचा. मात्र एके दिवशी त्यांनी पत्नीलासोबत घेऊन काळाचौकी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. हा गुन्हा भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

भोईवाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी जोशी यांना धीर देत त्यांची फिर्याद दाखल करून आरोपी निकम विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यात निकमला बेड्या ठोकण्यात आल्या असून न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केल्याचे पोलिसांनी सांगितले. निकमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी तो जामिनावर बाहेर येऊन आपल्याला त्रास देणार असल्याच्या भीतीने मात्र जोशी यांची झोप उडाली आहे.