होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गरिबांच्या घरासाठी केवळ हजार रुपये मुद्रांक शुल्क!

गरिबांच्या घरासाठी केवळ हजार रुपये मुद्रांक शुल्क!

Published On: Aug 11 2018 1:40AM | Last Updated: Aug 11 2018 1:26AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील 382 शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी बांधण्यात येणार्‍या घरांसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क तसेच भागीदारी गृहप्रकल्पांना मोजणीशुल्कात पन्नास टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे ही योजना राबविण्याची घोषणा केली आहे. राज्यात म्हाडामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 2022 पर्यंत राज्यास 19 लाख 40 हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाने विविध सवलती जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेले सार्वजनिक व खासगी भागीदारी धोरण राज्यात राबविण्यात येणार आहे. खासगी जमीन मालक व म्हाडा यांच्यातील संयुक्त भागीदारीच्या माध्यमातून घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे.

खासगी जमीनमालकाकडून एक रुपयाही  न घेता म्हाडा त्याच्या जागेवर इमारत उभी करून विक्री करणार आहे. याबदल्यात जमीनमालकाला 35 टक्के बांधकाम क्षेत्र किंवा प्रकल्पातील घरकुलांच्या विक्रीतून येणार्‍या रकमेतील 35 टक्के रक्कम दिली जाईल. तर 65 टक्के रक्कम म्हाडाच्या तिजोरीत जमा होईल. संयुक्त भागीदारी धोरणांतर्गत बांधण्यात येणारी सर्व घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील विक्री केली जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने या घरांसाठी केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क व भागीदारी गृहप्रकल्पांना मोजणीशुल्कात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.