होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिल्लीच्या ऑनलाईन ठगांनी उडवली डोंबिवलीकरांची झोप

ऑनलाईन ठगांनी उडवली डोंबिवलीकरांची झोप

Published On: Jan 22 2018 2:00AM | Last Updated: Jan 22 2018 2:00AMडोंबिवली : वार्ताहर

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनरा बँकेमधील सुमारे 7 ग्राहकांच्या खात्यातील सुमारे सव्वा दोन लाखांची रोकड दिल्लीच्या ठगांनी परस्पर काढल्याची घटना उघडकीस आल्याने खातेदारांची झोप उडाली आहे.  खातेदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तशी तक्रार दाखल केली आहे. मात्र, रामनगर पोलिसांनी केवळ दोनजणांचे 70 हजार रुपये आमच्या हद्दीतून गेले. अन्य जणांचे पैसे कोणात्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेले याचा तपास सुरू असल्याचे सांगून माहिती देण्यास नकार दिला.

पाटकर रोडवरील कॅनरा बँकेमधील सुमारे 7 ग्राहकांच्या खात्यातील सुमारे सव्वा दोन लाखांची रोकड दिल्लीतील ठगांनी परस्पर काढल्याची घटना दोन दिवसांत उघडकीस आली. या प्रकरणी डोंबिवलीकर रहिवासी परेश बोंडीवले यांचे त्याच बँकेच्या खात्यातून 10 हजार रुपये परस्पर लंपास झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत लेखी तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. 

या तक्रारीच्या आधारावर रामनगर पोलीस तपास करीत आहेत. तेव्हा परेश बोंडीवले यांच्यासह अन्य 6 जणांचेही हजारो रुपये बँक खात्यातून अचानक गायब झाले. त्यात एकाचे 60 हजार, 15 हजार, तर कोणाचे 70 हजार, 2 हजार रुपये, अशा विविध स्वरुपात रकमा खात्यातून आपोआप इतरत्र वळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अधिकृत माहिती देण्यास बँक प्रशासन आणि पोलिसांनी नकार दिला आहे. परंतु बँकेच्या सिस्टममधून हे पैसे दिल्लीतून काढल्याची माहिती बँकेच्या खातेदारांना देण्यात आली आहे.