Thu, Apr 25, 2019 18:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत बेवारस कार 'खातात' २० एकर जमीन 

मुंबईत बेवारस कार 'खातात' २० एकर जमीन 

Published On: Dec 02 2017 7:58PM | Last Updated: Dec 02 2017 7:49PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एका बाजूला सर्वसामान्य मुंबईकराला आपली कार पार्क करण्यासाठी मजबूत रक्कम मोजावी लागत असताना दुसर्‍या बाजूला मुंबईतील रस्त्यांवर उभ्या करण्यात आलेल्या बेवारस हजारो कारनी तब्बल २० एकरापेक्षा जास्त जागा व्यापली असल्याचे एका पहाणीत समोर आले आहे. याबाबत मुंबई महापालिकेने केलेल्या पहाणीत १ जानेवारी २०१६ पासून २३ ऑगस्ट २०१७ दरम्यान तब्बल ६ हजार ४१३ कार रस्त्यांवर बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या आढळून आल्या आहेत. यातील दोन हजार ८२६  वाहनांचा लिलाव करण्यात आला असून उर्वरित कार उचलून गोदामात टाकण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. 

मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातर्फे गेल्या ऑक्टोंबरमध्ये करण्यात आलेल्या आणखी एका सर्व्हेक्षणात ६०५ आणखी बेवारस गाड्या आढळून आल्या असून त्यांना आता हटवण्यात येणार आहे. २३ ऑगस्टला झालेल्या पहिल्या लिलावात महापालिकेने दोन हजार ८२६ गाड्यांसाठी निविदा मागवल्या होत्या. यातून महापालिकेला १.१४ कोटींचा महसूल मिळाला आहे.  यानंतर दोन महिन्यानंतर करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात ६०५ गाड्या बेवारस स्थितीत आढळल्या असून त्यांनीही बरीच जागा व्यापली आहे.

यासंदर्भात सामान्य नागरिकांकडून वारंवार आलेल्या तक्रारींवरुन महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. अशा वाहनांपासून सामान्य जनतेला धोका निर्माण होवू शकतो, असा या तक्रारींचा सूर आहे. बेवारस वाहने दूर करण्याच्या प्रक्रीयेसंदर्भात बोलताना सहाय्यक नगरपालिका आयुक्त मधूकर मगर यांनी सांगितले की, बेवारस स्थितीत आढळून आलेल्या वाहनांवर नोटीस लावून ती महापालिकेतर्फे ४८ तासांमध्ये ती हटवली जातात. यानंतर वाहनांवर दावा करणार्‍या मालकांना ३० दिवसांची मुदत दिली जाते. यादरम्यान सदर वाहने महापालिकेच्या वरळी, अंधेरी व घाटकोपर येथील गोदामांमध्ये ठेवली जातात.

प्रत्येक बेवारस कार सरासरी सात फूट बाय १६ फूट म्हणजेच १२४ वर्ग फूट इतकी जागा व्यापत असते. अशाप्रकारे सात हजार कारचा विचार केला तर सरासरी २० एकर जमीन लागते, अशी माहिती आरटीओच्या अधिकारी सूत्रांनी दिली.