Wed, May 22, 2019 06:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘ते’ लॉटरीचे तिकीट बनावट

‘ते’ लॉटरीचे तिकीट बनावट

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 15 2018 12:39AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याणमधील लॉटरीच्या दुकानातून एका टेम्पोचालकाने महाराष्ट्र राज्य सरकार गुडीपाडवा बंपरचे 1 कोटी 11 लाख रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. नशिबाने त्याला लॉटरी देखील लागली. त्यानंतर तीन महिने सतत लॉटरी कार्यालयात खेटे घालूनही त्यांना रक्कम मिळत नव्हती. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला असता, ते लॉटरीचे तिकीट बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रिन्स लॉटरी सेंटरच्या विक्रेत्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुहास कदम असे लॉटरी लागूनही नशिबाने थट्टा केलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. 16 मार्च रोजी त्याने कल्याणला प्रिन्स लॉटरी सेंटरमधून 100 रुपये किंमतीचे गुडी पाडवा सोडतची एक तिकीट खरेदी केले. लॉटरी तिकीटावर बक्षिसाची रक्कम 1 कोटी 11 लाख रुपये होती.  त्याने 20 मार्च लॉटरीच्या सोडत दिनी तिकीट पाहिले. तेव्हा त्याला लॉटरी लागल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने ज्या दुकानातून तिकीट विकत घेतले तिथे पोहचला. या दुकानात त्याला उलट-सुलट उत्तर दिले गेले. त्यानंतर त्याने नवी मुंबई येथील लॉटरी विभागाच्या कार्यालयातही चौकशी केली. मात्र समाधानकारण उत्तर मिळाले नाही. अखेर महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुहासच्या तक्रारीनुसार ते लॉटरीचे तिकीट बनावट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी प्रिन्स लॉटरी सेंटरच्या विक्रेत्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.