Tue, Apr 23, 2019 09:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईला वेध थर्टी फर्स्टचे 

मुंबईला वेध थर्टी फर्स्टचे 

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:22AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी मुंबईत सुरू आहे. मुंबईतील क्लब, हॉटेल व्यावसायिकांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी पॅकेजची घोषणा केली आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमासह जेवण व विविध प्रकारच्या मद्याचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही मुंबईकरांनी शहरापासून जवळ असलेली विरार-अर्नाळा येथील रिसॉर्ट आरक्षित केली आहेत. थर्टी फर्स्ट नाईटसाठी या भागातील सर्व रिसॉर्ट आताच हाऊसफुल्ल झाली आहेत.

अनेक बारमधील थर्टी फर्स्टच्या रात्रीसाठी मेनू कार्ड बदलून त्याचे दर 15 ते 20 टक्क्याने वाढवण्यात आले आहेत. एरव्ही बारमध्ये सिग्‍नेचरचा एक पेग 150 ते 200 रुपयाला मिळतो. हाच दर थर्टी फर्स्टच्या रात्रीला 300 ते 400 रुपये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाईनशॉपमध्ये 1200 ते 1300 रुपयाला मिळणार्‍या प्रीमियम व्हिस्कीसाठी हॉटेलमध्ये 3 ते 4 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. अनेकांनी इमारतीच्या गच्चीवर पार्टीचे आयोजन केले आहे. त्याच्या तयारीसाठी क्रॉफर्ड मार्केट येथील पी. के. वाईन्सबाहेर गेल्या काही दिवसापासून व्हिस्की खरेदीसाठी तळीरामांची गर्दी वाढली आहे.

मुंबईतील क्‍लब व हॉटेलमधील पार्टी महागात पडणार असल्यामुळे अनेकांनी विरार-अर्नाळा येथील रिसॉर्ट थर्टी फर्स्टच्या रात्री आरक्षित केली आहेत. रिसॉर्टमध्ये गुपचूप स्वत:कडील दारू पिण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तळीरामांचा दारूचा खर्च कमी होणार आहे. 

त्यामुळे विरार-अर्नाळा, नवापूर, कळंब आदी भागातील सर्व रिसॉर्ट मालक थर्टी फर्स्टला येणार्‍या मुंबईकरांसाठी सज्ज झाले आहेत. रिसॉर्टने प्रतिमाणसी 700 ते 800 रुपये प्रवेश शुल्क व रूमचे स्वतंत्र भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय विरार पश्‍चिमेला असणार्‍या याझू पार्क येथेही थर्टी फर्स्टसाठी मुंबईकरांनी आरक्षण केल्याचे समजते. याझू पार्कने प्रतिमाणसी मोफत राईडसह जेवण, सांस्कृतिक कार्यक्रमाचे 799 रुपये प्रवेश शुल्क ठेवले आहे.