होमपेज › Mumbai-Thane-Raigad › थर्टी फर्स्टला डीजेचा आवाज खाली!

थर्टी फर्स्टला डीजेचा आवाज खाली!

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:31AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांच्या माध्यमातून ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षाता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात येत आहे. 31 डिसेंबरच्या रात्री कुठेही डीजे लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत. डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला आहे.

वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार 55 ते 65 डेसिबल्सच्या मर्यादतच ध्वनिक्षेपकांचा वापर करता येईल. त्यापेक्षा अधिक आवाजात ध्वनिक्षेपकाचा वापर हॉटेल्स, तसेच सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही. पर्यटन स्थळे, इकोसेन्सिटिव्ह झोन्स, शांतता क्षेत्रात डीजेसारख्या मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यास यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 31 डिसेंबरला आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांत डीजे वाजवून कुठेही ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणानी घ्यावी, असे रामदास कदम यांनी सांगितले.

महाबळेश्‍वर येथील कीज हॉटेलवरील कारवाई नियमानुसार महाबळेश्वर येथील  कीज हॉटेलवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमानुसार कारवाई केली असून कुणाच्या आदेशाने किंवा सुडबुद्धीने केलेली नाही, असे पर्यावरण मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. कीज हॉटेलसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 59 खोल्यांची परवानगी देेण्यात आली होती. त्याऐवजी पार्किंग जागेवर अनधिकृतपणे 27 खोल्या अधिकच्या बांधण्यात आल्या आहेत. सांडपाण्याची एक लाईन नगरपालिकेच्या पाण्यात सोडलेली आहे. यासंदर्भात संबंधित हॉटेल व्यवस्थापनास नियमानुसार रितसर नोटीस देऊन आणि पुरेसावेळ देऊन कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.