Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › थर्टीफर्स्टला मुंबईत ३० हजार पोलीस

थर्टीफर्स्टला मुंबईत ३० हजार पोलीस

Published On: Dec 29 2017 1:58AM | Last Updated: Dec 29 2017 1:51AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

नववर्षाचे जल्लोषामध्ये स्वागत आणि थर्टीफर्स्टच्या रात्री होणार्‍या सेलिब्रेशनसाठी मुंबापुरी सज्ज झाली असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई पोलीस दलातील 30 हजार पोलीस जवान बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले असून यासाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अतिरेक्यांच्या कायम टार्गेटवर असलेल्या मंत्रालयासह शहरातील सर्व शासकीय मुख्यालये, मंदिरे आणि प्रार्थनास्थळे, मोठ्या बाजारपेठा आणि चौपाट्या, तसेच विदेशी पर्यटकांच्या गर्दीच्या, महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

थर्टीफस्टचे सेलिब्रेशन आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात होणार्‍या गर्दीला टार्गेट करत अतिरेकी कारवायांच्या शक्यतेतून तपास यंत्रणांसह राज्य दहशतवादविरोधी विभाग (एटीएस), केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या, शीघ्रकृती दल, फोर्सवन, बॉम्बशोधक व नाशक पथकेही मुंबई पोलिसांच्या दमतीला तैनात ठेवण्यात आली आहेत.

शहराच्या प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत संशयित व्यक्ती, सामान आणि वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सोबतच हॉटेल्स आणि लॉज यांचीही कसून तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सी-फेस, दादर चौपाटी, शिवाजी पार्क, वांद्रे बँडस्टँड, जुहू चौपाटी, मढ-मार्वे याठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन येथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले असून ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हवर वाहतूक पोलिसांनी विशेष करडी नजर ठेवली आहे. गेट वे ऑफ इंडिया आणि मरिन ड्राईव्ह या ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. जल्लोष साजरा करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.