Thu, May 23, 2019 20:24
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मॅट्रीमोनियल साईटवर धुमाकूळ; 50 लाखांचा घातला गंडा!

मॅट्रीमोनियल साईटवर धुमाकूळ; 50 लाखांचा गंडा

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 10:50AMमुंबई : प्रतिनिधी

जीवनसाथी आणि शादी डॉट कॉम अशा प्रसिद्ध मॅट्रीमोनियल साईटवरुन तरुणींना लग्नासाठी मागणे घालत त्यांना लुटणार्‍या 31 वर्षीय ठकसेनाला गजाआड करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. कृष्णा चंद्रसेन देवकाते असे या आरोपीचे नाव असून त्याने मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पुणे येथील तब्बल 25 तरुणींना 50 लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चारकोप परिसरात राहात असलेल्या 37 वर्षीय तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रीमोनियल साईटवर आपले प्रोफाईल अपलोड केले होते. जानेवारी महिन्यात तिला एका तरुणाकडून रिक्वेस्ट आली. त्या तरुणाने आपण ट्राय या सरकारी संस्थेत नोकरी करत असल्याचे नमूद केले होते. प्रोफाईल आवडल्याने तरुणीने त्याची रिक्वेस्ट स्विकारली. त्यानंतर दोघांमध्ये फोनवरुन बोलणे सुरु झाले. तरुणी आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच या तरुणाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

विश्‍वास संपादन करत तिच्याशी लगट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तरुणाने वेगवेगळी कारणे सांगून तिच्या क्रेडीट कार्डचा वापर करत लाखो रुपये उकळले. आपला विवाह होणार या आनंदात असलेल्या तरुणीने त्याच्यावर आंधळा विश्‍वास ठेवला होता. मात्र दोन महिन्यांत तिला लुटून हा तरुण नॉटरिचेबल झाला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने तरुणीने मार्च महिन्यात चारकोप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन चारकोप पोलीस आरोपीचा शोध घेत होते. 

तरुणीची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आल्याने गुन्हे शाखेचे उपायुक्त निसार तांबोळी आणि सहायक पोलीस आयुक्त अभय शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष 11 च्या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, अरविंद घाग, रईस शेख, सहायक पोलीस निरीक्षक शरद झिने, नितीन उत्तेकर, शेषराव शेळखे यांच्यासह अंमलदारांच्या पथकाने याचा समांतर तपास सुरु केला. 

तरुणीला फसविणार्‍या त्या आरोपी तरुणाने मॅट्रीमोनियलवर आपली खोटी माहिती भरली होती. त्यामुळे पोलीस पथकाने तरुणीसोबत त्याने संपर्क साधलेल्या दिवसापासून, तो नॉटरिचेबल होईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचा तपास सुरु केला. तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा आरोपी कल्याण परिसरात राहात असल्याचे हेरले. तब्बल दोन दिवस सापळा रचून पोलीस पथकाने शुक्रवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले. 

गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत, जीवनसाथी आणि शादी डॉट कॉमवर असे अनेक बनावट प्रोफाईल उघडल्याचे पोलिसांना सांगितले. सरकारी नोकरीत असल्याची बतावणी करत त्याने तब्बल 25 तरुणींना अशाप्रकारे तब्बल 50 लाखांना गंडा घातल्याचीही धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली. अखेर गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकून पुढील चौकशीसाठी चारकोप पोलिसांच्या हवाली केले आहे.