Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : ‘ते’ वाचले...पण अमेरिकेतून आलेल्या मित्रांना गमावले

मुंबई : ‘ते’ वाचले...पण अमेरिकेतून आलेल्या मित्रांना गमावले

Published On: Dec 30 2017 1:01PM | Last Updated: Dec 30 2017 1:17PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिलमधील हॉटलमध्ये जे अग्नितांडव झाले, त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. यात ११ महिलांचा समावेश आहे. या घटनेने मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देश हादरून गेला आहे. आगीच्या घटनेवेळी कोणी वाढदिवस साजरे करत होते. तर, कोणी जेवण करत होते. कोणी आपले रक्तातील नातेवाईक गमावले, तर कोणी जीवलग मित्र. 

मुंबईचे रहिवासी हेमांग झाकिया आपली पत्नी आणि अमेरिकेतून आलेल्या दोन मित्रांसह कमला मिल्समधील हॉटेलात गेले होते. खूप वर्षांनंतर मित्रांशी भेट झाल्याने हेमांग खूश होते. पण, त्यांच्या आनंदावर अग्नितांडवाने विरजण पडले. सुदैवाने हेमांग यांचा जीव वाचला...पण आगीने त्यांच्या मित्रांना त्यांच्यापासून कायमचे दूर केले. जेवण संपत असतानाच, आग लागली आणि हेमांग, त्यांची पत्नी पल्लवी आणि दोन मित्र आगीत अडकले. हेमांग आणि त्यांची पत्नी सुदैवी म्हणून आगीतून बाहेर पडले.

हेमांग या अपघातात किरकोळ जखमी झाले असून, पत्नी पल्लवी सुमारे 40 टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर सकाळी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. हेमांग यांना मध्यरात्रीच डिस्चार्ज दिला आहे. तर त्यांच्या पत्नीवर मुंबईतील भाटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेमांग झाकिया यांच्या नातेवाईक झरना अगिचा म्हणाल्या की, आम्ही रोज या हॉटेलमध्ये जातो. आमच्यासाठी हा धक्काच होता. जीव वाचवण्यासाठी पळायलाही लोकांना मिळालं नाही. जीव वाचवण्यासाठी ते बाथरुममध्ये गेले, पण धुरामुळे काहीच दिसत नव्हते. श्‍वास गुदमरत होता. पण, तरीही बाथरूममध्ये थांबलो आणि आग तिथेही पसरली होती.