Mon, Apr 22, 2019 21:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ८ सप्टेंबरपासून सहा दिवस अरबी समुद्रात मोठे उधाण

८ सप्टेंबरपासून सहा दिवस अरबी समुद्रात मोठे उधाण

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 12:58AMमुंबई : प्रतिनिधी 

अरबी समुद्रात 8 सप्टेंबरपासून सलग सहा दिवस मोठे उधाण येणार आहे. यावेळी समुद्रात 4.53 ते 4.85 मीटर उंचीच्या महाकाय लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या काळात चौपाटी व समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारण्यास येणार्‍या मुंबईकरांसह पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. 

अरबी समुद्रात जुलै महिन्यात मोठे उधाण आले होते. यावेळी 5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी शहरात पावसानेही जोर धरला होता. त्यामुळे मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया येथील रस्त्यावर पाणी आले होते. बांद्रा, खार, वेसावे आदी कोळीवाड्यात पाणी घुसल्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा शनिवार 8 सप्टेंबर ते गुरुवार 13 सप्टेंबरपर्यंत सलग सहा दिवस समुद्राला मोठे उधाण येणार आहे. मात्र यावेळी मुंबईत पावसाचा जोर नसल्यामुळे या उधाणाचा फारसा फटका बसणार नाही. 

समुद्राला भरती असताना समुद्रकिनारी व गिरगाव, दादर, जुहू, सातबंगला, वेसावे, मढ, गोराई, मार्वे आदी चौपाटींसह अन्य चौपाटींवर फेरफटका मारणे धोक्याचे असल्याचे मत पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आले. उधाण काळात समुद्रात 4.85 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्यामुळे पाणी किनार्‍याबाहेर फेकण्याची शक्यता आहे.