Thu, Jun 27, 2019 03:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टोलनाक्यावर पिवळा पट्टा पाहणारी यंत्रणाच नाही 

टोलनाक्यावर पिवळा पट्टा पाहणारी यंत्रणाच नाही 

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:01AM

बुकमार्क करा

मुंबई : चंद्रशेखर माताडे

टोलनाक्यावर पिवळ्या पट्ट्याबाहेर वाहन उभे असल्यास त्या वाहनधारकांकडून टोल घेता येणार नाही अशी घोषणा करण्यात आली. मात्र कोणत्याही टोलनाक्यावर वाहन नेमके कोठे उभे आहे हे  पाहणारी  सरकारी यंत्रणाच नाही.  एकट्या  वाहनधारकाला टोलनाक्यावर  ज्या छळाचा   सामना करावा लागतो ते पाहता निर्णय जाहीर झाला असला तरी अंमलबजावणी कशी  करणार,  हे  अनुत्तरीतच आहे.

टोलनाक्यांवर पिवळा पट्टा असतो त्या पट्ट्याच्या बाहेर जर वाहन थांबले असेल तर टोल न देण्याची तरतूद टोल वसुलीचे कंत्राट देताना करारनाम्यातच करण्यात येते. या तरतुदीची अंमलबजावणी करण्याची मागणी अनेक वेळा टोल अभ्यासकांनी केली आहे. मात्र त्याची साधी दखलही घेतली गेली नाही. 

टोलनाक्यांवर लागणार्‍या लांबचलांब रांगा हे चित्र काही नवे नाही. नाताळच्या  पार्श्‍वभूमीवर आलेल्या सलग सुट्यांमुळे शुक्रवारी खालापूर टोलनाक्यावर एक दोन नव्हे तर तब्बल आठ किलोमीटरची रांग लागल्याचे चित्र  प्रसारमाध्यमातून येताच एकच खळबळ उडाली. 

त्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी, पिवळ्या पट्ट्याबाहेर वाहन थांबले असल्यास टोल देण्याची गरज नाही. जर अशा वाहनधारकांकडून टोलची वसुली केली जात असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

करारनामा आणि मंत्र्यांची घोषणा याचे स्वागतच केले पाहिजे. मात्र त्याची अंमलबजावणी कशी केली जाणार तेही स्पष्ट होण्याची गरज आहे. कोणत्याही टोलनाक्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाची यंत्रणा दिसत नाही. टोलनाक्यावर राज्य आहे ते केवळ कंत्राटदारांचे. या पार्श्‍वभूमीवर वाहने पुढे पुढे जात असताना ते नेमके पिवळ्या पट्टयाबाहेर आहे की नाही हे कोण ठरविणार? जर सरकारी यंत्रणाच अस्तित्वात नसेल तर टोलनाक्यातील संघटित ताकदीला एकटा दुकटा वाहनधारक कसा काय तोंड देऊ शकेल ?  याचाही विचार व्हायला हवा. टोलनाक्यांवर होणार्‍या छळातून व  तेथे झालेल्या मारहाणीतून लोकप्रतिनिधीही सुटलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर वाहन पिवळ्या पट्टयाबाहेर असल्याचे निश्‍चित करणारी यंत्रणाच नसेल तर घोषणेच्या अंमलबजावणीचे काय, असा प्रश्‍न मागे उरतोच.