Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजकीय संन्यास घेण्याचा प्रश्‍नच नाही : चंद्रकांतदादा

राजकीय संन्यास घेण्याचा प्रश्‍नच नाही : चंद्रकांतदादा

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:14AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

कोल्हापूरमध्ये निवडणूक लढविण्याबाबत केलेले वक्तव्य हे गणेशोत्सवातील डॉल्बीच्या वापराबाबत होते. त्याचा अर्थ मी राजकीय संन्यास घेणार असा नाही. हा विषय आपल्या हातात नाही, तो निर्णय पक्ष घेत असतो. मला पक्षाने अजून तरी निवडणूक लढवू नका म्हणून सांगितलेले नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 
कोल्हापूरमध्ये गणराया अ‍ॅवॉर्ड वितरण सोहळ्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असे सांगून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लावले जात होते.  

ते म्हणाले, मी निवडणूक लढवणार नाही हा विषय कोल्हापूरमधील डॉल्बीशी संबंधित होता. माझे वक्तव्य हे त्या विषयाशीच संबंधित होते. गेल्यावर्षी कोल्हापुरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा झाला. काल पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी डॉल्बी बंद केल्यामुळे काही मंडळी नाराज झाल्याचे वक्तव्य केले. त्यावर आपण डॉल्बी बंद करणे हा काही आपला वैयक्तिक किंवा राजकीय अजेंडा नव्हता. सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी एखादी एखादा भूमिका घ्यावी लागली आणि ती घेतल्याने मला मतदान झाले नाही तरी चालेल, पण अशी समाजहिताची भूमिका मी आवश्य घेईन, असे मी म्हणालो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

माझ्या वक्तव्याचा संबंध हा कालच्या घटनेपुरता होता. त्याचा अर्थ मी निवडणूक लढविणार नाही असा नाही. मी निवडणूक लढवावी की नाही, हा निर्णय सर्वस्वी पक्ष घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.