Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्वेलर्समध्ये चोरी, पुतण्यासह साथीदाराला बेड्या

ज्वेलर्समध्ये चोरी, पुतण्यासह साथीदाराला बेड्या

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:19AMउल्हासनगर : वार्ताहर 

काकाच्या ज्वेलर्समधून नोकराच्या मदतीने रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरी करून पसार झालेल्या पुतण्याला त्याच्या सहकार्‍यासह उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. मोबाईल टॉवरच्या लोकेशनद्वारे हिललाईन पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोघांकडून जवळपास 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

अंबरनाथ येथील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका येथे किशनसिंग चौहाण यांच्या मालकीचे जे. बी. ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा श्रवणसिंग देवीसिंग चौहाण (18) हा काम करत होता. गेल्या 4 वर्षात त्याने दुकानात कामाला असलेला पुरणनसिंह सज्जनसिंह राठोड (23) याच्या मदतीने विविध प्रकारचे सोन्याचे सुमारे 8 लाख 10 हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी हिललाईन पोलीसांत तक्रार करण्यात आली होती. 

पोलीस या दोघांचा शोध घेत होते. सिडीआर, एसडीआर व मोबाईल टॉवर लोकेशनवरून घनश्याम पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.कौराती, पो.ना. जाधव, पो. शि. जावळे, सुदिप भिंगारदीवे यांनी राजस्थान येथे जाऊन श्रवणसिंग व पुरणसिंह यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जवळपास 1 किलोहून अधिक सोन्याचे दागिने, 4 लाख 17 हजारांची रोकड त्याचप्रमाणे चोरी केलेले सोन्याचे दागिने विकून विकत घेतलेली आय-20 कार असा जवळपास 29 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

या ज्वेलर्समधून 8 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात दाखल असली तरी आतापर्यंत अनेकदा श्रवणसिंग देवीसिंग चौहाण याने त्या दुकानातून सोने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरीस गेलेल्या मुद्देमालापेक्षा मोठ्याप्रमाणात चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करण्याची कामगिरी केली आहे. अटक करण्यात आलेले श्रवणसिंग चौहाण, पुरणनसिंह राठोड या दोघांनाही न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे.