Sun, May 19, 2019 22:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता राज्यात बसस्थानकांवर चित्रपटगृहे!

आता राज्यात बसस्थानकांवर चित्रपटगृहे!

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 2:20AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

एसटीची राज्यात 609 बसस्थानके असून गेली 40 वर्षे त्यात बदल झालेला नाही. अशा 80 बसस्थानकांचे रूपडे पालटणार आहे. काही निवडक स्थानकांवर 60 आसनांची चित्रपटगृहे उभारण्यात येणार असून ती केवळ मराठी चित्रपटांसाठी राखीव असणार आहेत. त्याचबरोबर विद्याविहार येथे 1 हजार 72 घरांचे निवासी संकुल बांधण्यात येणार असून लवकरच त्याचे भूमिपूजन होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी केली. 

मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या 31 विभागीय कार्यालयांत कर्मचार्‍यांना नवीन तयार ’गणवेश वितरण सोहळा’ व विविध नावीन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

गेल्या 15 वर्षांत स्थानिक आमदारांच्या निधीतून उभारलेल्या मार्गस्थ निवार्‍यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना उन्हातान्हात उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांसाठी एसटी  3500 मार्गस्थ निवारे उभारणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, रावते यांनी उत्तम योजना मांडल्या आहेत, कर्मचार्‍यांच्या  वेतनासाठीदेखील त्यांनी प्रयत्न करावेत. एसटीत शिवशाही आणली, एसटी कारभारातदेखील शिवशाही आणली पाहिजे. 

नवा गणवेश : राज्यभरात 31 ठिकाणी एकाच वेळी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रवासी ‘स्मार्टकार्ड’योजना, ‘लाल परी’ परिवर्तन बस, संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्प, प्रसाधनगृहांची निर्मिती, मार्गस्थ निवारे, विश्रांतीगृहे, निवासी संकुले, बसस्थानके यांच्या कायापालटासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. एसटी महामंडळाच्या 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच कर्मचार्‍यांच्या गणवेशात बदल केला आहे.