Fri, Jul 19, 2019 01:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांनी मारहाण केल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी महिलेला अटक

पोलिसांनी मारहाण केल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी महिलेला अटक

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:47AMठाणे : प्रतिनिधी

विटावा येथे विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत येऊन थेट वाहतूक पोलिसाला धडक देऊन जखमी केलेल्या महिलेने कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी मारहाण केल्याचा बनाव केला आणि तसा व्हिडीओ देखील व्हायरल केला. मात्र हा व्हिडीओ खोटा असून आम्ही सदर महिलेला कुठल्याही प्रकारे मारहाण केलेली नाही असा दावा वाहतूक पोलिसांनी करत आरोपी महिला दुचाकीस्वार आयशा काझी हिच्याविरुद्ध शुक्रवारी कळवा पोलिसात गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणी आयशाला अटक करण्यात आली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. 

दोन दिवसांपूर्वी विटावा येथील गणपतीपाडा नाक्यावर दोन कारचालकांमध्ये सुरू असलेला वाद वाहतूक पोलीस सोडवत होते. त्यावेळी विटाव्याकडे विरुद्ध दिशेने येणार्‍या आरोपी महिला दुचाकीस्वार आयशा काझी हिला येथील वाहतूक पोलीस मोहिते यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव वेगात असलेल्या काझी हिने मोहिते यांना धडक देऊन तेथून पळ काढला. यावेळी तिला रोखण्यासाठी स्थानिकांनी वाहतूक पोलिसाला मदत केली. या घटनेनंतर काझीने कळवा वाहतूक पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांना कामाला लावते अशी धमकी देखील दिल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला. 

दरम्यान याप्रकरणी वाहतूक पोलिसाने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर काझी हिने वाहतूक पोलिसांनी मारहाण केल्याचा खोटा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. सदर व्हिडीओ थेट वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याची पडताळणी केली असता हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला. इतकेच नव्हे तर काझीविरुद्ध कळवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.