Tue, Jul 23, 2019 06:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विमानतळाजवळील 10 हजार चौरस फुटांचे हॉटेल जमीनदोस्त

विमानतळाजवळील 10 हजार चौरस फुटांचे हॉटेल जमीनदोस्त

Published On: Aug 11 2018 1:23AM | Last Updated: Aug 11 2018 1:23AMमुंबई : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर गेल्या काही महिन्यात अनधिकृतरित्या उभे राहिलेले हॉटेल शुक्रवारी पालिकेच्या अंधेरी के पूर्व विभागाने जमीनदोस्त केले. 30 खोल्या असणार्‍या व 10 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक आकार असणार्‍या या हॉटेलवर कारवाई करण्यात आल्यामुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. 

अंधेरी पूर्वेकडील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणार्‍या सहार व्हिलेज परिसरातील सुतार पाखाडी भागात नगर भागातील एका भूखंडावर तीन मजली इमारत अनधिकृतपणे बांधण्यात येत होती. या भूखंडावर गेल्या  7 महिन्यांपासून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई महापालिकेद्वारे एमएमआरडीएला वेळोवेळी कळविण्यात आले होते. तथापि, काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएच्या स्थानिक अधिकार्‍यांनी हा भाग त्यांच्या अखत्यारित येत नसल्याचे कळवले, एवढेच नाही तर या बांधकामावर महापालिकेद्वारे कारवाई करण्याचे कळविले. त्यानंतर पालिकेद्वारे बांधकामास स्टॉप वर्क नोटीस देऊन, कोर्टात कॅव्हेट देखील दाखल करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी सांगितले. 

स्टॉप वर्क नोटीस दिल्यानंतर देखील संबंधितांनी अनधिकृत बांधकाम उभारण्याचे थांबविले नाही. त्यामुळे के पूर्व विभागाच्या 30 कामगार व अधिकार्‍यांद्वारे या बांधकामावर तोडकाम कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी पालिकेच्या पथकाच्या मार्गात वाळूच्या गोण्या टाकून कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात बुलडोजर, जेसीबी व अन्य साधनसामुग्रीच्या सहाय्याने सदर अनधिकृत बांधकाम अवघ्या 12 तासांत जमीनदोस्त करण्यात आल्याचे सकपाळे यांनी सांगितले. कारवाईला विरोध करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली असल्याचेही सकपाळे यांनी सांगितले.