Tue, Jun 25, 2019 15:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्य रेल्वेच्या राजधानीची चाचणी यशस्वी

मध्य रेल्वेच्या राजधानीची चाचणी यशस्वी

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:09AM
ठाणे : रविराज पाटील

मध्य रेल्वेकडून सुरु करण्यात येणारी राजधानी एक्सप्रेस सुरु करण्याच्या हालचाली वेगात सुरु असून या गाडीची सीएसीटी ते इगतपुरीपर्यंतची पहिली चाचणी गुरुवारी मध्यरात्री यशस्वीरित्या पार पडली असून दुसरी चाचणी सोमवारी पार पडणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी दिली.  मुंबई- नाशिक भुसावळमार्गे दिल्लीला जाणारी ही गाडी सुरु करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत असताना गुरुवारी पार पडलेल्या चाचणीने ही गाडी सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

सध्या मुंबई सेंट्रल, तसेच वांद्रे टर्मिनस येथून दोन राजधानी एक्सप्रेस धावतात. परंतु प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद पाहता या गाड्यांचे बुकींग अनेकदा फुल्ल असते. त्यामुळे आणखी राजधानी एक्सप्रेस गाडी सुरु करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेवून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या प्रस्तावाला मंजुरीही दिली होती. त्यानुसार नव्याने सुरु होणारी ही गाडी नाशिक जळगांव मार्गे दिल्ली येथे सुरु करण्यात येणार आहे. त्याची यशस्वी चाचणी गुरुवारी मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान पार पडली.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते  इगतपुरी अशी ही चाचणी पार पडली आहे. रेल्वे च्या अधिकृत सुत्रानुसार ही गाडी जानेवारीच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे या गाडीची चाचणी घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

पश्‍चिम रेल्वे मार्गावरुन धावण्यात येणार्‍या दोन्ही राजधानी एक्सप्रेसचा लाभ राज्यातील अधिक प्रवाशांना घेता येत नाही, त्या पार्श्‍वभुमीवर ही गाडी सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. ही नव्याने सुरु होणारी गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरुन सुटून ती कल्याण, नाशिक, जळगांव खांडवा, भोपाल झांसी, आग्रा, हजरत निजामुद्दीन मार्गे दिल्लीला पोहोचेल.