Wed, Mar 27, 2019 01:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत गाववाल्यांची खोली’ धोक्यात!; गावचे स्थानिक राजकारण शिरले खोलीत

मुंबईत गाववाल्यांची खोली’ धोक्यात!; हजारो चाकरमानी बेघर होण्याच्या मार्गावर

Published On: Jul 10 2018 9:27AM | Last Updated: Jul 10 2018 9:27AMमुंबई : संजय कदम

साठ वर्षांहून अधिक काळ चाकरमान्यांचे आश्रयस्थान बनलेली ‘गाववाल्यांची खोली’ सध्या धोक्यात आली आहे. गावातील गटातटाचे राजकारण खोलीमध्ये शिरल्याने आणि पुनर्विकासात कोटीहून अधिक किंमत मिळत असल्याने या खोल्या ज्यांच्या नावावर आहेत, त्यांनी त्या विकण्याचा घाट घातला आहे. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणार्‍या या चाकरमान्यांमध्ये यावरून उभा वाद सुरू झाला असून हजारो चाकरमानी बेघर होण्याच्या मार्गावर आहेत.

पोटापाण्यासाठी ६०-६५ वर्षांपूर्वी कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह  राज्याच्या अन्य भागातून अनेक गावकरी मुंबईत आले. विशेषत: गिरण्यांमध्ये  या लोकांना मोठा रोजगार मिळाला. मात्र डोक्यावर छप्पर नसल्याने त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. यातूनच ‘गाववाल्यांची खोली’ ही संकल्पना उदयास आली. जमेल तशी वर्गणी काढून हे गाववाले भाड्याची खोली घेऊन राहू लागले. काहींनी खोल्या विकतही घेतल्या. आजही मुंबई, ठाण्यात गाववाल्यांच्या अशा तीन ते चार हजार खोल्या आहेत. भिलाई रोड, वरळी, शिवडी, मानखुर्द, भायखळा, सायन, चेंबूर, ठाणे या ठिकाणी या खोल्या आहेत. दहा बाय दहा किंवा दहा बाय पंधराच्या या खोल्यांमध्ये तब्बल २५ ते ३० लोक अगदी दाटीवाटीने आणि तरीही गुण्यागोविंदाने राहात होते. कधी आपापसात भांडणे नाहीत की कोणती तक्रार नाही. 

एकत्र कुटुंबाला लाजवेल अशा पद्धतीने मानेतमान घालून इतकी वर्षे राहणार्‍या या खोल्यांमध्ये स्थानिक राजकारण शिरले आहे. शिवाय पुनर्विकासात या खोल्यांना सोन्याचा भाव आल्याने ज्यांच्या नावावर खोली आहे, त्यांची नियत बदलल्याने या खोल्या परस्पर विकण्याचे सत्र सुरू झाले आहे. याच खोलीत राहणार्‍या एका गटाकडून हा मलिदा वाटून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत सुमारे १५ ते २० टक्के खोल्यांचे व्यवहार परस्पर झाल्याची माहिती मुंबईतील ‘कोल्हापूर शिवशाहू प्रतिष्ठान’चे अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी दिली.

या खोल्या तांत्रिक कारणाने कोणा एकाच्या नावावर असल्या तरी त्यांची मालकी मात्र संपूर्ण गावाची किंवा गावच्या मंडळाची असायची. त्यामुळे या एकाच खोलीवर सुमारे २०-२५ जणांचे वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड काढण्यात आले. कामाच्या ठिकाणी राहण्याचा पत्ताही याच खोलीचा दिला गेला आहे. असे असताना या खोलीवर कुणी एकट्याने हक्क सांगू नये, असे गेली ३० वर्षे डिलाईल रोड येथील सोहराब चाळीतील गाववाल्यांच्या खोलीत राहणार्‍या कृष्णा पाटील यांनी सांगितले. पाटील हे मुळचे आजरा तालुक्यातील होणेवाडी येथील आहेत. त्यांचे आजोबा आणि वडील याच खोलीत राहात होते, अशी माहिती त्यांनी दिली. 

पैशाच्या लालसेने गावाचे वैभव तुम्ही असे नष्ट करु नका, असे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी जो सुशिक्षित होता किंवा बोलका-चालका होता, अशा व्यक्तींच्या नावावर सर्वानुमते खोली करण्यात आली होती. मात्र त्या खोलीची मालकी मात्र सर्वांची होती अशी माहिती त्यांनी दिली.

खोली वाचवायला हवी !

संयुक्त कुटुंब पद्धतीलाही लाजवेल अशी ही गाववाल्यांची खोली धोक्यात आली आहे. इथे गुण्यागोविंदाने वर्षापूर्वी राहाणार्‍या खोलीत स्थानिक राजकारण घुसले आहे. तिथले राजकीय मतभेद आणि त्यातून निर्माण झालेली गटबाजी खोल्यांच्या अस्तित्त्वासाठी धोकादायक ठरली आहे. त्यातून दोन गट पडून खोली विकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तसेच पुनर्विकासात एक कोटीहून अधिक भाव मिळू लागल्याने नियत खराब झाली आहे. 
- कृष्णा पाटील, साहेबराव चाळ, डिलाईल रोड 

पुढच्या पिढ्यांचा विचार करावा

अख्या महाराष्ट्रातील गावांचा ग्रामस्थांच्या खोल्या मुंबईत आहेत. या खोल्या विकल्यातर चाकरमान्यांचे मुंबईतील अस्तित्वच नष्ट होईल. तेव्हा पुढच्या पिढीचा विचार व्हावा. बी. डी. डी चाळीतील दोन खोल्या विकण्याचा डाव सुरू आहे. याबाबत आम्ही जनजागृती सुरू केली असून गावातही बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत खोल्या विकू देणार नाही.
- जीवन भोसले, नेसरी, गडहिंग्लज, कोल्हापूर