Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘क’ आणि ‘ड’ वर्गाचीच पदे मानधन तत्त्वावर भरणार

‘क’ आणि ‘ड’ वर्गाचीच पदे मानधन तत्त्वावर भरणार

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 1:11AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य प्रशासनात यंदा 36 हजार पदांची भरती होणार असून, त्यापैकी केवळ ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील पदे ही पाच वर्षांसाठी मानधन तत्त्वावर भरली जातील. तर वर्ग एक आणि दोनची पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असा खुलासा वित्त विभागाने केला आहे. ‘क’ वर्गाची पदे जिल्हा निवड मंडळामार्फत, तर ‘ड’ वर्गाची पदे भरण्याचे अधिकार खातेप्रमुखांना देण्यात आल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकर भरतीवरील बंदी शिथिल करीत दोन दिवसांपूर्वी प्रशासनात 36 हजार पदे भरण्यास मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर वित्त विभागाने लगेच शासन निर्णय जारी केला. या निर्णयात पदोन्‍नती श्रेणीतील सर्वात खालचे पद तसेच जिल्हास्तरावरील पदे भरताना ती शिक्षण सेवक, कृषिसेवक, ग्रामसेवकांच्या धर्तीवर पहिल्या पाच वर्षांपर्यंत मानधन स्वरूपात भरण्यात यावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांची पात्रता आणि कामगिरी तपासून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

मानधनावर पदे भरण्याच्या निर्णयावर सरकारी कर्मचारी संघटना तसेच विरोधकांनीही तीव्र नाराजी व्यक्‍त केली. याबाबत वित्त विभागाने दिलेल्या माहितीनुसार कृषिसेवक, शिक्षण सेवक, पशुधन सेवक यांच्याप्रमाणे पहिल्या पाच वर्षांसाठी ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील पदे भरली जातील. ही पदे भरण्यापूर्वी पद निश्‍चिती करून सेवाप्रवेश नियम तयार करण्यात येणार आहेत. कर्मचार्‍यांना दिले जाणारे मानधन आणि त्याचा कालावधी याविषयी संबंधित विभाग निर्णय घेणार आहे. ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील भरती ही महापरीक्षा या सरकारी संकेतस्थळावरून होऊ शकते, असेही वित्त विभागाच्या सूत्रांनी सांगितले.