Sun, Dec 08, 2019 19:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

Published On: Jul 19 2019 1:20PM | Last Updated: Jul 19 2019 1:17PM
नवी मुंबई : प्रतिनिधी 

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवकाचा एक गट येत्या १५ ऑगस्टपर्यंत भाजपमध्ये दाखल होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत एका जेष्ठ नगरसेवकाच्या माध्यमातून बैठका सुरू आहेत. मात्र असा कोणता ही गट नसून अशा कोणत्याही बैठका झाल्या नसल्याचे सांगत ही केवळ अफवा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात माजी मंत्री गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची बैठक झाली होती. त्यावेळी नगरसेवकांनी पक्ष बदलाबाबत नाईकांना विनंती केली होती. महापौर, स्थायी समितीचे आजी- माजी सभापती, पदाधिकारी उपस्थित होते. ज्यांना ज्यायचे त्यांनी खुशाल जावे असा सल्ला नाईकांनी यावेळी दिला होता. 

मात्र राजकीय वातावरण आणि वारे बघून गणेश नाईक यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये जाणे गरजेचे असल्याचे काही नगरसेवक आज ही सांगतात. गेल्या विधानसभेत गणेश नाईक यांचा पराभव झाला. खासदारकीला  आनंद परांजपे यांचा पराभव झाला. महापौर निवडणुकीत काटे की टक्कर देत महापौर पद मिळाले. या सर्व गोष्टीचा उल्लेख स्पष्टपणे मांडून ही निर्णय घेतला जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपात जाण्यासाठी तयार झाला आहे. 

या नगरसेवकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी माजी महापौर सागर नाईक यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरी भागातील नगरसेवकांचा समावेश आहे.