होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीच्या भिवंडी शहराध्यक्षाच्या हत्येचा कट फसला!

राष्ट्रवादीच्या भिवंडी शहराध्यक्षाच्या हत्येचा कट फसला!

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 12:50AMभिवंडी : संजय भोईर

राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष खालिद मुख्तार शेख ऊर्फ खालिद गुड्डू यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मोहमद साजिद निसार अन्सारी (30 रा.किडवाईनगर) व दानिश मो. फारुख अन्सारी (20,रा.शांतीनगर) या दोन शार्पशूटरांना गुड्डू यांच्या हत्येची दोन लाखांची सुपारी देण्यात आली होती.  त्यांना शहर पोलिसांनी संशयास्पदरित्या फिरत असताना 21 जून रोजी ताब्यात घेतल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आतापर्यंत चारजणांना अटक केली असून या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेले काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.

शहरातील समदनगर परिसरातील एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या मोहमद साजिद निसार अन्सारी (30 रा.किडवाईनगर) व दानिश मो. फारुख अन्सारी (20,रा.शांतीनगर,) या दोन शार्पशूटरांना शहर पोलिसांनी 21 जून रोजी अटक केली होती. त्यांच्याकडे दोन पिस्तूल व 15 जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आली होती. चौकशीदरम्यान मोहम्मद साजीद निसार अन्सारी व दानिश मोहम्मद फारुक अन्सारी या दोघांनी मेहबूब आलम मेहमूद आलम सिद्दीकी या बिल्डरने खालिद गुड्डू यास जीवे ठार मारण्याची दोन लाखाची सुपारी दिल्याची धक्कादायक काबुली पोलिसांना दिली. 

याबाबत पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके हे या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच या कटामध्ये काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक तथा माजी महापौर अहमद सिद्दीकी, अशफाक सिद्दीकी, अलिमुद्दीन बक्कन सरदार सिद्दीकी उर्फ गुड्डू बक्कन , आलम बक्कन सरदार सिद्दीकी उर्फ बच्चा शेठ यांनी या हत्येचा कट रचल्याबाबतची माहिती चौकशीतून उघड झाल्याने पोलिसांनी 25 जून रोजी पटेल नगर, खंडू पाडा या विभागात पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करून अहमद सिद्दीकी, अशफाक सिद्दीकी, अलिमुद्दीन बक्कन सरदार सिद्दीकी यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री पुन्हा सोडून दिले. 

हत्यारांसह पकडलेल्या मोहम्मद साजीद निसार अन्सारी व मोहम्मद दानिश मोहम्मद फारुक अन्सारी यांना 3 जुलैपर्यंत तर, शुक्रवारी न्यायालयात हजर केलेले आरोपी अशफाक सिद्दीकी, अलिमुद्दीन बक्कन सरदार सिद्दीकी उर्फ गुड्डू बक्कन यांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविलेल्या अहमद सिद्दीकी या काँग्रेस नगरसेवकावर पोलिसांनी तो चौकशीस सहकार्य करेल या बाबीवर विश्वास ठेऊन सोडून दिलो होते. मात्र, तो फरार झाल्याचे समोर आल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.