Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आंदोलनाविरोधातील याचिका मागे घेणार

मराठा आंदोलनाविरोधातील याचिका मागे घेणार

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:43AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा आंदोलनादरम्यान झालेली तोडफोड आणि नुकसानीप्रकरणी कारवाईची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका 13 ऑगस्टला सुनावणीवेळी मागे घेणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. आशिष गिरी यांनी स्पष्ट केले आहे. मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी तोडफोडीच्या घटनांची दखल घेतल्याने याचिकेचा हेतू सफल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये पुणे, औरंगाबादसह राज्यभर तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्याविरोधात द्वारकानाथ पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावर प्रतिबंध घालावा आणि सार्वजनिक आणि खासगी संपत्तीची नासधूस करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, सर्व आंदोलकांना कलम 149 अंतर्गत नोटिसा देण्यात याव्यात, हिंसाचार करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत आणि हिंसा करणारे कोण आहेत हे शोधून काढावे, आदी मागण्या याचिकेद्वारे करण्यात आल्या होत्या.

या याचिकेवर 13 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, ही याचिका मागे घेतली जाणार असल्याचे द्वारकानाथ पाटील यांचे वकील आशिष गिरी यांनी स्पष्ट केले आहे. याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील यांनी ही याचिका मागे घेण्यास आपल्याला सांगितले आहे. मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी तोडफोडीच्या घटनांची दखल घेतली असून, याचिका दाखल करण्याचा हेतू सफल झाला आहे. त्यामुळे 13 तारखेला याचिका मागे घेऊ, असे गिरी यांनी स्पष्ट केले आहे.