होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता धान्य किंवा रोख पैसे; मुंबईत होणार  पहिला प्रयोग

आता धान्य किंवा रोख पैसे; मुंबईत होणार  पहिला प्रयोग

Published On: Aug 22 2018 1:37AM | Last Updated: Aug 22 2018 1:12AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

रेशनवर मिळणार्‍या धान्याऐवजी रोख पैसे  स्वीकारण्याचा पर्याय रेशनकार्डधारकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्यात याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबई  शहरातून याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुबंई ठाणे विभागाची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. 

गेल्या काही वर्षापासून रेशनकार्डधारकांना धान्याऐवजी रोख सबसिडी देण्याचा पर्याय सरकारच्या विचाराधीन होता. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात अनेक अडचणी होत्या. देशभर रेशनकार्ड  हे आधारशी लिंक करण्यात आल्यामुळे रेशनकार्डधारकांना धान्याऐवजी रोख सबसिडी थेट लाभधारकांच्या खात्यावर जमा करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. 

त्यामुळे ही योजना राबविण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. केंद्र व राज्य सरकारची ही योजना असल्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.या योजनेला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद , त्याच्या अंमलबजावणीत येणार्‍या अडचणी  याचा अभ्यास करून मगच ती सर्व राज्यात टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. 

रेशनवर अन्नधान्य, साखर, रॉकेल उपलब्ध करून दिले जाते. त्याचा फायदा थेट लाभधारकांलाच मिळतो की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ई पॉज मशिन्सचा वापर नुकताच सुरू करण्यात आला. या मशिन्सच्या वापरात संपूर्ण राज्यात कोल्हापूरने बाजी मारली.

मात्र आता धान्य किंवा रोख पैसे असा पर्याय निवडण्याचे स्वतंत्र्य हे रेशनकार्डधारकांना असणार आहे.कार्डधारकांने आपली पसंती दिल्यानंतर त्याला त्याचा थेट लाभ मिळऊन दिला जाणार आहे. या योजनेची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात ही मुबंई ठाणे  येथून प्रायोगिक तत्त्वावर  करण्यात येणार आहे. मुबंईत परळ केंद्रातील आझाद मैदान व महालक्ष्मी या दोन धान्य दुकानांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात एका स्वयंसेवी संस्थेशी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकताच एक सामंजस्य करारही केला आहे. 

सप्टेंबर महिन्याच्या अन्नधान्यावरील अनुदानाचा फायदा कोणत्या पध्दतीने घ्यायचा व धान्यापोटी मिळणारे अनुदान हे बँक खात्यात जमा करायचे का?यासंदर्भात   रेशनकार्डधारकांनी येत्या 15सप्टेंबरपर्यंत पर्याय द्यायचा आहे. ज्यांनी रोख अनुदानाचा प्रस्ताव दिला असेल त्यांचे अनुदान हे महिला कुटुंबप्रमुखाच्या नावावर असलेल्या बँक खात्यावरच थेट जमा करण्यात येणार आहे.