Tue, Mar 19, 2019 15:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाट चुकलेल्या ट्रेकर्सनी झाडाखाली काढली रात्र

वाट चुकलेल्या ट्रेकर्सनी झाडाखाली काढली रात्र

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:39AMबदलापूर : वार्ताहर

बदलापूरपासून जवळ असलेल्या चंदेरी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 6 पर्यटकांची पोलिसांनी यशस्वी सुटका केली आहे. सिद्धार्थ गजभिये, जेकब अब्राहम, वैष्णवी खोडदे, पार्वती गौड, अनुराग देशमुख आणि वैष्णवी मिश्रा अशी या पर्यटकांची नावे आहेत. डोंगरावर गेलेले हे सहाही पर्यटक एअर इंडियामध्ये अप्रेंटीशीप करत होते. ते नाशिक आणि पुणे येथे येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. 

शनिवारी सकाळी या सहा जणांनी चंदेरी डोंगरावर चढण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत ते डोंगरावर जाणार होते. मात्र, पावसाचे प्रमाण वाढल्याने ते रस्ता चुकले. त्यामुळे या सगळ्यांनी आहे त्याच ठिकाणी थांबणे पसंत केले. त्यातच मोबाईलला नेटवर्क नसल्याने व जोरदार पाऊस असल्याने खाली उतरायचे कसे हा मोठा प्रश्‍न होता. हे सर्व एका झाडाखाली रात्रभर बसून राहिले. सकाळ झाल्यानंतर यातील अब्राहम याने आपल्या मित्रांना फोन करून अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर मित्राने पोलीस कंट्रोलरूमला फोन करून आपले काही मित्र चंदेरी डोंगरावर अडकल्याची माहिती दिली. 

त्यानुसार कुळगांंव पोलीस ठाण्याचे एपीआय अविनाश पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी चंदेरी डोंगरावर कूच केली. सकाळी सहा वाजता या पर्यटकांपैकी एका मुलाचे व्हॉट्सअ‍ॅप लोकेशन घेऊन पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. लोकेशन सापडल्याने पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत या सर्वांना पोलीस ठाण्यात आणून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. गर्द झाडी, जोरदार कोसळणारा पाऊस आणि मोबाईला रेंज नसल्याने या पर्यटकांचा जीव मेटाकुटीला आला होता. मात्र पोलिसांनी योग्य वेळी मदत केल्याने या संकटातून सुटल्याचे जेकब अब्राहम याने सांगितले.