Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नास नकार देणार्‍या तरुणीला थांबविण्यासाठी धमकी

बॉम्बची निनावी कॉल करणार्‍या तरुणाला अटक

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 12:41AMमुंबई : प्रतिनिधी

बॉम्बचा निनावी कॉल करणार्‍या कुतुबुउद्दीन शाहिवाला या 29 वर्षीय तरुणाला शनिवारी सहार पोलिसांनी मुंबई सेंट्रल येथून अटक केली. लग्नास नकार देणार्‍या तरुणीने यमनला जाऊ नये म्हणून त्याने तिला थांबविण्यासाठी हा बॉम्बचा कॉल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

कुतुबुउद्दीन शाहिवाला हा तरुण मुंबई सेंट्रल येथे राहत असून त्याचे तिथेच एक हार्डवेअरचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्याची एका तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीतून ते चांगले मित्र झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. 25 वर्षांची ही तरुणी यमन देशाची नागरिक असून अनिवासी भारतीय आहे. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या कुटुंबियांसोबत औरंगाबाद येथे एका नातेवाईकांच्या लग्नासाठी आली होती. 

लग्नानंतर तिने तिच्या पालकांना कुतुबुउद्दीनविषयी माहिती दिली होती. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते मुंबईत आले होते. मात्र त्याने चॅटदरम्यान दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात त्याची माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्याचा स्वतःचा व्यवसाय असून तो गर्भश्रीमंत आहे असे त्याने सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. त्याने खोटी माहिती देऊन त्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी लग्नास नकार देत यमन देशात जाण्याचा निर्णय घेतला होता. 

शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजता तो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. साडेपाच वाजता त्यांची फ्लाईट होती. याच दरम्यान तेथील नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने ही तरुणी बॉम्ब घेऊन विमानात जात असल्याची माहिती दिली होती. 

या फोननंतर तिथे असलेल्या सुरक्षा अधिकार्‍यांना धक्काच बसला होता. त्यामुळे या तरुणीसह तिच्या कुटुंबिय आणि विमानतळावर आलेल्या नातेवाईकांची पोलिसांनी चौकशी सुरु होती. दुसरीकडे श्‍वान पथकाच्या मदतीने बॉम्बशोधक व नाशक पथकाने संपूर्ण विमानतळाची तपासणी केली होती. जवळपास सात तास ही तपासणी सुरु होती. तिथे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह पोलिसांना सापडले नाही. अखेर त्यांना यमन देशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. 

याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा नोंदवून कॉल करणार्‍या व्यक्तीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच मुंबई सेंट्रल येथून कुतुबुउद्दीन शाहिवाला या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. लग्नास नकार देऊन यमनला जाणार्‍या तरुणीने विदेशात जाऊ नये म्हणून त्याने हा निनावी कॉल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.