Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये मतदानाचा सर्वाधिक टक्‍का बविआकडे

पालघरमध्ये मतदानाचा सर्वाधिक टक्‍का बविआकडे

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:28AMडहाणू : वार्ताहर

पालघर लोकसभा मतदारसंघातील आपला सर्वाधिक टक्‍का बहुजन विकास आघाडी स्वत:कडे कायम राखणार काय? असा प्रश्‍न असून, बविआने आपला टक्‍का राखल्यास धक्‍कादायक निकालांची शक्यता वर्तवली जाते. 

2014 च्या पालघर लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे चिंतामण वनगा यांनी पालघर जिल्ह्यातून 5 लाख 33  हजार 201 एवढे विक्रमी मताधिक्य मिळवले. या मताधिक्यामध्ये शिवसेनेची मते  जोडली गेली आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे (बविआ) बळीराम जाधव यांना 2 लाख 93 हजार 681 एवढी मते मिळाली होती. 2009 च्या पालघर लोकसभा निवडणुकीत बळीराम जाधवांना 2,23,234, अ‍ॅड. चिंतामण वनगा यांना 2,10,874, आणि काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांना 1,60,570 तर माकपच्या लहानू कोम यांना 92,224 मते मिळाली होती. 2014 मध्ये मोदीलाटेमुळे शिवसेना आणि भाजपच्या एकत्रित प्रयत्नातून 5,33,201 मते मिळवली.

युतीच्या मतांमध्ये घवघवीत वाढ झाली हे खरे असले, तरी बविआच्या मतांमध्ये स्वबळावर 70 हजारांची वाढ झाली आहे. हा आकडाही या पोटनिवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. बविआच्या ताब्यात सहापैकी 3 विधानसभा, वसई-विरार महानगरपालिका, वसई, डहाणू पंचायत समिती, जिल्हा परिषदेत विषय समितीमध्ये अध्यक्षपद, पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आहेत.त्यामुळे प्रयत्न सत्कारणी लागल्यास आपल्या ताब्यातून गेलेली लोकसभा बविआ सहजपणे मिळवू शकते.

सर्वात जास्त मतदानाचा टक्का वसई, नालासोपारा, बोईसर मतदारसंघात आहे. या भागात बविआचे पूर्ण वर्चस्व आहे. त्याचा फायदा यावेळी होऊ शकतो. सेना, भाजप वेगवेगळे लढत आहेत. राज्यात भाजपला बविआने बिनशर्त पाठिंबा दिला असला, तरी पालघर लोकसभेत भाजपला पाठिंबा देणे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडणारे नाही. केंद्रात आखडलेला हात पोहोचवण्यासाठी आपला हक्काचा प्रतिनिधी बविआला हवा आहे. या दोन्ही शक्यता या निमित्ताने पूर्ण करणे बविआला शक्य होणार आहे. भाजप, शिवसेना, बविआ, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रत्येक पक्षाची स्वत:ची मते आहेत. ती टिकवून ठेवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नांत आहेत.