Sat, May 30, 2020 00:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तब्बल ३३ लिटर दूध देणाऱ्या मुऱ्हा म्हशीची ५१ लाखाला विक्री!

तब्बल ३३ लिटर दूध देणाऱ्या मुऱ्हा म्हशीची ५१ लाखाला विक्री!

Last Updated: Feb 28 2020 4:08PM
हिसार (हरियाणा) : पुढारी ऑनलाईन 

हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील लिटणी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांची जागतिक विक्रम केलेली मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीला पंजाबच्या लुधियाना येथील शेतकरी पवित्र सिंग यांनी ५१ लाखात विकली आहे. काही वर्षांपूर्वी सिंघवा खास खेड्यातील मुऱ्हा जातीची म्हैस लक्ष्मी २५ लाख रुपयांना विकली गेली होती, ती गुजरातच्या एका शेतकऱ्याने खरेदी केली होती. 

पंजाबच्या लुधियाना येथे झालेल्या डेअरी व अ‍ॅग्रो एक्स्पो स्पर्धेत काही महिन्यांपूर्वी सरस्वती म्हशीने जागतिक विक्रम नोंदविला होता. तिने तब्बल ३३.१३ लिटर दूध दिले होते. त्यावेळी म्हैशीच्या मालकाला दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. म्हैस विक्रीपूर्वी लिताणी येथील शेतकरी सुखबीर सिंग ढांडा यांनीही सोहळा पार पाडला. यामध्ये हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील शेकडो शेतकरी सहभागी झाले. 

सुखबीर सांगतात की त्यांना आपली म्हैस विकायची नव्हती, पण परिसरातील म्हैस चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने सरस्वतीची चोरी होईल अशी भीती वाटू लागली होती. यापूर्वी सर्वाधिक दूध देण्याचा विक्रम पाकिस्तानच्या म्हशीच्या नावावर होता. तिने ३२.०५० लिटर दूध दिले होते. सुखबीर म्हणाले की, चार वर्षापूर्वी बरवला येथील खोखा गावचे शेतकरी गोपीराम यांच्याकडून एक लाख 30 हजार रुपयांना सरस्वती म्हस खरेदी केली होती.

सुखबीर म्हणाले की म्हैस सरस्वतीने दिलेला एक रेडा ज्याचे नाव नवाब आहे. नवाबाचे वीर्य विकून ते दरवर्षी लाखो रुपये कमवत आहेत. शास्त्रज्ञ त्यांच्या सरस्वतीकडून क्लोन तयार करण्याचीही तयारी करत आहेत. सरस्वतीपासून जन्मलेल्या रेड्याची किंमत चार लाख रुपये आहे. ते म्हणाले की सरस्वतीने मागील वर्षी हिसारमध्ये २९.३१ लिटर दूध देऊन पहिले पारितोषिक जिंकले होते. हिसारमधील मध्यवर्ती म्हैस संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या एका स्पर्धेत ही मुऱ्हा सर्वाधिक दूध देत होती.